स्वयं अध्ययन पुस्तिकेद्वारे आश्रमशाळांमध्ये शिक्षण सुरु

स्वयं अध्ययन पुस्तिकेद्वारे आश्रमशाळांमध्ये शिक्षण सुरु

अकोले (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाद्वारे नगर जिल्ह्यात चालवण्यात येणार्‍या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंअध्ययन व्यवसायमाला पुस्तकांद्वारे आता आश्रमशाळा विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी डॉ. संतोष ठुबे यांनी दिली. लॉकडाऊनमुळे आदिवासी विकास विभागाद्वारे चालवल्या जाणार्‍या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना यापूर्वी शाळा स्तरावरील व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून शिक्षण चालू होते. ते शिक्षण थांबू नये, शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील संवाद चालू राहावा, विद्यार्थी, शिक्षक संबंधातील तुटत जाणार्‍या श्वासाला संजीवनी मिळावी या हेतूने स्वयंअध्ययन पुस्तिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे.

सदर पुस्तिकेत मराठी, इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांचा समावेश करण्यात आलेला असून दुसरी ते दहावी असे दोन वर्ग मिळून एक स्वयंअध्ययन पुस्तिका तयार करण्यात आलेली आहे. क्रमिक पुस्तकाशिवाय मुलांना स्वयंअध्ययन करता यावे हा या पुस्तकाचा हेतू आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षणातील प्रमाण वाढत असताना लॉकडाऊनच्या परिस्थितीत आश्रमशाळा मुलांची शिक्षणातून गळती होऊ नये व आदिवासी गाव पाड्यावरील शिक्षणाची चळवळ कोरोनामुळे थांबू नये म्हणून राजूर एकात्मिक आदिवासी प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळेतील दुसरी ते दहावी या वर्गातील मुले मुली स्वयंअध्ययन पुस्तिकेद्वारे 1 जून ते 30 ऑगष्ट अखेर शिक्षणाचे धडे गिरवत असल्याची माहिती सहाय्यक प्रकल्पअधिकारी रोहिदास साबळे यांनी दिली.

करोनासारख्या महामारीत ग्रामीण भागांतील मुलांचे शिक्षण मोबाईलद्वारे चालू होते, परंतु स्मार्टफोनची आदिवासी भागात सर्वांसाठी उपलब्धता शक्य नसल्याने स्वयंअध्ययन पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु या मार्गाने देखील विद्यार्थ्यांच्या मनाचा तळ गाठणे शक्य नसले तरी मुलांना शिक्षण प्रवाहात ठेवणे शक्य होणार आहे.

राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थी 16 मार्चपासून घरी गेलेले आहेत. या विद्यार्थ्यांचे शिक्षण चालू राहावे यासाठी राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाद्वारे प्रकल्प अधिकारी व काही ध्येयवेड्या शिक्षकांच्या संकल्पनेतून लॉकडाऊनच्या काळात मुलांना स्वयंअध्ययन करता यावे यासाठी सारेगम शिक्षण प्रकल्प व शिक्षण कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने व्यवसायपुस्तिका तयार करण्यात आली आहे. सदर व्यवसायपुस्तिका नगर जिल्ह्यातील राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामध्ये आश्रमशाळा विद्यार्थ्यांना शिक्षकांनी गाव पाड्यावरील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन वितरीत केली असून शिक्षणासाठी प्रोत्साहित केले आहे.

सदर पुस्तकास आश्रमशाळा विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून भ्रमणध्वनीद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून प्रतिक्रिया जाणून घेत आहेत. तसेच, आदिवासी समाजाच्या सामाजिक जाणीवेतून गरजवंत व नैसर्गिक आपत्ती ओढवलेल्या कुटूंबांना व गरजू विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात मदत म्हणून प्रतीशिक्षक 1000 रुपये याप्रमाणे राजूर प्रकल्पातील आश्रमशाळा शिक्षकांद्वारे प्रकल्पस्तरावर मदत निधी फंड उभा केला आहे. सामाजिक उत्तरदायित्व म्हणून आश्रमशाळा कार्यक्षेत्रातील गरजवंतांना संसार उपयोगी साहित्य व अन्नधान्य-किरणा स्वरूपात मदत केली जात आहे. या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमाचे आदिवासी समाजातून कौतुक होत आहे.

  • स्वयं अध्ययन प्रकल्पाची वैशिष्ट्ये
  • नगर जिल्ह्यातील 22 आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना होणार फायदा.
  • सरासरी पाच हजार विद्यार्थी घेणार स्वयं अध्ययन पुस्तिकेद्वारे शिक्षणाचे धडे.
  • 1 जून ते 30 ऑगष्ट अखेर स्वयंअध्ययन पुस्तिकेचा वापर.
  • मराठी, इंग्रजी, गणित व विज्ञान या विषयांचे चालणार स्वयंअध्ययन.
  • दोन वर्ग मिळून एक स्वयंअध्ययन पुस्तिकेची निर्मिती.
  • मुलभूत संकल्पना व क्रमिक पाठावर आधारित होणार स्वयंअध्ययन.

शिक्षकांच्या ज्वलंत इच्छाशक्तीच्या बळावर तयार करण्यात आलेल्या स्वयंअध्ययन व्यवसायमालेद्वारे आश्रमशाळा विद्यार्थी घरी राहून शिक्षणाचे धडे गिरविणार असून करोनाला रोखणं आणि विद्यार्थ्यांना जोखणं या दोन दिव्यातून आश्रमशाळा शिक्षण जात असून जीवनाची सुंदरता, मधुरता अनुभवण्यासाठी शिक्षण हवे आहे, परंतु त्यासाठी निकोप जगण्याची नवी रीत आपणांस शिकावी लागेल यातूनच आदिवासी आश्रमशाळा शिक्षणाला पुन्हा उंच भरारी घेता येऊ शकेल.
– डॉ. संतोष ठुबे, प्रकल्प अधिकारी, राजूर.

Related Stories

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com