Saturday, April 27, 2024
Homeनगरसुगंधी तंबाखूच्या वाहतुकीला खाकी संरक्षण !

सुगंधी तंबाखूच्या वाहतुकीला खाकी संरक्षण !

वाहतूक मार्गावर सर्व काही मॅनेज; परराज्यांतून जिल्ह्यापर्यंत वाहतूक

अहमदनगर – तरुणांना विष खाऊ घालून लाखो रुपयांची माया देणार्‍या सुगंधी तंबाखूला संरक्षण कसे, याचा अभ्यास देखील नगरकरांना विचार करणारा लावणारा आहे. या धंद्याच्या कच्चा मालाच्या वाहतुकीपासून ते पक्क्या मालाच्या वितरणापर्यंत सर्व काही माहीत असून देखील अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासन हाताची घडी घालून बसले आहे. या अवैध धंद्याच्या वाहतुकीवरच लाखो रुपयांची उलाढाल होते. यावरून या धंद्यातील मायाचा मोह किती असेल, याचा अंदाज येतो.

- Advertisement -

सुगंधी तंबाखूची व्याप्ती शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आहे. एका जिल्ह्यापासून दुसर्‍या जिल्ह्यापर्यंत आणि राज्यापासून ते परराज्यांपर्यंत. अहमदनगरमध्ये तयार होणारी सुगंधी तंबाखू (मावा) हा नगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यात ‘नगरी मावा’ म्हणून चांगलाच प्रसिद्ध आहे.

अहमदनगरची बदनामीसाठी हे आणखी एक पुरसे आहे. या धंद्यासाठी लागणारा कच्चा माल परराज्यातून येतो. त्यामुळे या मालाची वाहतूक करणे जिकरीचे असते. ज्या मार्गाने वाहतूक होते, त्यावरील कर्मचार्‍यांपासून ते अधिकार्‍यांपर्यंत सर्व काही मॅनेज केले जाते. त्यासाठी विशिष्ट अशी वेळ ठरली जाते. त्याचवेळी या कच्चा मालाची वाहतूक होते. हा माल एकदमच खरेदी केला जातो. त्यामुळे वाहतुकीचे सर्व नियोजन अर्थपूर्णपणे सुरक्षितेच्या दृष्टीने पूर्ण केले जाते. त्यानंतरच त्याची वाहतूक होते.

कच्च्या मालाची पॅकिंग देखील समोरच्याला संशय येणार नाही, अशी असते. यावरून या मालाच्या वाहतुकीचे गोपनीयता विशिष्ट पातळीवर पाळली जाते.

कच्चा माल पहाटे ठिकाणावर येईल, असेच पाहिला जाते. तो उतरविण्यासाठी देखील मजूर ठरलेले असतात. त्यामुळे या मजुरांना नेमके कोणता माल उतरविला जात आहे, हे देखील कळले जात नाही. कच्चा मालापासून उत्पादन झाल्यानंतर म्हणजेच सुगंधी तंबाखूचे (मावा) वितरण देखील अतिशय गोपनीय पद्धतीने केले जाते. प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल होईल, असे उत्पादन घेतले जाते. पानटपर्‍यांवर पोहोचविण्यापासून सर्व काही त्यात ठरले जाते.

कच्चा माल ते पक्क्या मालापर्यंत जे काही वितरण होते, त्याची माहिती अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासनाने नसले हे पटण्यासारखे नाही. प्रभारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बीट अमलदार महत्त्वाच्या भूमिकेत असतात. आपल्या बीटमध्ये कुठे काय चालले आहे, त्याची सर्वश्रूत माहिती त्याला असते. नावातच सुगंध असलेल्या सुगंधी तंबाखूच्या कारखान्यांची माहिती नसणे हे पटण्यासारखे नाही.

बीट अमलदारापासून ते प्रभारी पोलीस अधिकार्‍यापर्यंत या शहरात थाटलेल्या मिनी सुगंधी तंबाखू कारखान्यांचा ओला सुगंध दरवळतो आहे. त्यामुळे या अवैध धंद्यावर कारवाई होण्यापेक्षा त्यांना जास्त खतपाणी मिळत आहे. संरक्षण मिळत आहे. या सुगंधी तंबाखूच्या उत्पादनात रखवालदारच भागीदार असल्याचेही बोलले जात आहे. शेतच कुंपण खात असल्याने कारवाई होणार कशी, असा प्रश्न केला जात आहे. (क्रमशः)

पोलीस अधिकार्‍यांचे झोपेचे सोंग
सुगंधी तंबाखूचा वास हा लपून रहात नाही. त्यातच त्यावर बंदी आहे. त्यामुळे सुगंध कितीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी दाबत नाही. असे असले तरी अहमदनगर शहरासह आजूबाजूच्या भिंगार, केडगाव, बुरूडगाव, मुकुंदनगर, सावेडी, एमआयडीसी परिसरातील नागरी वसाहतींमध्ये हे मिनी कारखाने जोरात सुरू आहेत. बीट अमलदाराला याची पहिली माहिती असते. येथूनच सुगंधी तंबाखूच्या सुगंधाचा दरवळ प्रभारी पोलीस अधिकार्‍यापर्यंत पोहचतो. परिणामी तेरी भी चूप, मेरी भी चूप, याप्रमाणे हा अवैध धंदा तेजीत सुरू आहे. लोकांसाठी सामाजिक हितासाठी मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या निर्णयांच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. अन्न व औषध प्रशासनातील अधिकार्‍यांची भूमिका कुबड्या घेतल्यासारखी आहे. कारवाई करण्याचे धाडस न करण्यापासून त्यांची सुरूवात होते. माहिती असून कारवाई कोणी करायची? वरिष्ठ अधिकारी आदेश देत नाही तोपर्यंत कनिष्ठ अधिकार्‍यांनी माहिती असून देखील कारवाई करायची नाही. असे फर्मानच अन्न व औषध प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी काढले आहे. दोन्ही प्रशासनातील अधिकांर्‍यांनी सुगंधी तंबाखूबाबत पाळलेले मौन युवा पिढीसाठी विषारी ठरू पहात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या