248 जवानांनी घेतली देशसेवेची शपथ

jalgaon-digital
3 Min Read

लेफ्टनंट जनरल आहुजा यांनी 248 जवानांना दिली शपथ

अहमदनगर(प्रतिनिधी) – देशसेवेत आलेल्या जवानांनी ‘पहले देश, फिर रेजिमेंट और आखिर मे खुद’ असा मंत्र पाळावा असे सांगत लेफ्टनंट जनरल देपिंदर सिंह आहुजा यांनी जवानांना देशनिष्ठेची शपथ दिली.

नगरच्या मेकॅनाईज्ड रेजिमेंटल सेंटरमधील (एमआयआरसी) 248 जवानांनी शनिवारी शानदार संचलन करत देशनिष्ठेची शपथ घेतली. त्यावेळी ते बोलत होते. एमआयआरसीची ही 427 वी तुकडी होती. हे जवान विशेष प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत. या संचलनाची पहिली सलामी कर्नल विनायक शर्मा यांनी स्वीकारली. त्यानंतर मुख्य सलामी लेफ्टनंट जनरल देपिंदर सिंह आहुजा यांनी स्वीकारली. ते म्हणाले, 36 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जवान होणे, हे आपल्या लष्करी सेवेचे पहिले पाऊल आहे.

जवानाचे जीवन अतिशय कष्टप्रद खडतर आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनच तुम्ही लष्करात जवान झाले आहेत. यानंतर तुम्ही तांत्रिक प्रशिक्षण घ्याल. त्यानंतर तुम्ही आपापल्या पलटणमध्ये जाल. आजपासून आपला मुख्य धर्म देशरक्षण राहणार आहे. जवानांनी आधी आपला देशाचा सर्वांत प्रथम विचार करावा. त्यानंतर अनुक्रमे रेजिमेंट, पलटण मग स्वत:चा विचार करावा. देश रक्षणासाठी जवान आपल्या प्राणांचीही पर्वा करीत नाहीत, असा भारतीय सैन्याचा गौरवशाली इतिहास आहे. आज येथे शपथ घेणारे जवानही तो कायम ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एमआयआरसीतील अखौरा ड्रिल स्क्वेअर मैदानात सकाळी जवानांनी सादर केलेल्या शानदार संचलनाने उपस्थितांची मने जिंकली. हे मैदान हजारे जवानांच्या दीक्षांत संचलनाचे साक्षीदार आहे. या संचलनाचे नेतृत्व रिक्रुट सनी राठी यांनी केले. ले. जनरल आहुजा यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारल्यानंतर उघड्या जीपमधून त्यांनी संचलनाचे निरीक्षण केले. त्यानंतर राष्ट्रीय ध्वज घेतलेल्या तुकडीचे मैदानात आगमन झाले. त्यावेळी राष्ट्रगीताची धून वाजवण्यात आली.

सर्व उपस्थितांनी उभे राहून ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर हिंदू, शीख, मुस्लीम ख्रिस्ती धर्मगुरुंचे मैदानात आगमन झाले. त्यांच्याकडील धर्मग्रंथांवर हात ठेवून जवानांना देशरक्षणाची शपथ घेतली. त्यानंतर जवानांना देशनिष्ठेची शपथ देण्यात आली. या शानदार संचलनाबद्दल उपस्थित वरिष्ठ अधिकारी, निवृत्त अधिकारी जवानांच्या कुटुंबीयांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन दिले.

दीक्षांत संचलनानंतर जवानांनी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्याचा आनंद जल्लोष करून व्यक्त केला. प्रशिक्षणादरम्यान सर्वच क्षेत्रांत उत्कृष्ट कामगिरीबद्दल ले. जनरल आहुजा यांनी रिक्रुट शिवम सिंह याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, रामदयाल मूड याला जनरल केएल डिसुजा रौप्यपदक, तर दिनेश चंद याला जनरल सुंदरजी कांस्यपदक प्रदान केले.

वडिलांच्या छातीवर पदक; जवानांनो गौरव पदक
दीक्षांत संचलनानंतर कर्नल सचदेव यांनी पालकांनाही त्यांनी आपला सुपुत्र देशसेवेसाठी दिल्याबद्दल गौरव पदक प्रदान करून धन्यवाद दिले. त्यानंतर जवानांनी ते पदक स्वत: आपल्या वडिलांच्या छातीवर लावले. या सोहळ्यामुळे पालकांचा डोळे अभिमानाने भरून आला होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *