पुणे – कोंढवा, गुलटेकडी ते आरटीओ कार्यालय आणि सर्व पेठांचा भाग सील

पुणे – कोंढवा, गुलटेकडी ते आरटीओ कार्यालय आणि सर्व पेठांचा भाग सील

पुणे (प्रतिनिधी) – शहरात मोठ्या प्रमाणात ‘कोरोना’ विषाणू बाधित रुग्ण आढळून येत असल्याने पुणे महापालिकेने आता धडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. कोंढवा, गुलटेकडी ते आरटीओ कार्यालय आणि सर्व पेठांचा भाग सील करण्यात असल्याचे आदेश पुणे महापालिकेचे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.

सोमवार रात्री १२ वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. कोणता भाग सील झाला आहे, याचा निश्चित नकाशा पुणे पोलिसांकडून लवकरच जारी करण्यात येणार आहे. हा भाग सील करण्यात येणार असल्याने लोकांच्या जाण्या-येण्यावर बंधने येणार आहेत. मात्र, जीवनावश्यक वस्तू मिळणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

पुण्यातील जुन्या पेठांमध्ये कोरोनाचे ३७ रुग्ण सापडल्याने हा भाग सील करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे. आकडा वाढण्याला अटकाव करण्यासाठी सीलिंग करण्याशिवाय पर्याय नसल्याचे पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले. एकाच भागातील व्यक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुलटेकडी ते आरटीओ दरम्यानचा हा सगळा भाग असणार आहे. यानुसार नागरिकांना शंभर टक्के मास्क लावण्याचे बंधन असणार आहे. याशिवाय त्यांनी बाहेर पडायचे नाही. या क्षेत्रातून कोणालाही प्रवास करता येणार नाही. या सील केलेल्या भागात कोणालाही घराबाहेर विनाकारण पडता येणार नाही. कोणाला हा भाग ओलांडून पलीकडे जायचे असेल तरी त्याला या भागात येण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे. गुलटेकडी मार्केटयार्डचा भाग या सीलिंगमध्ये येणार असला तरी येथील भाजीपाला बाजार सुरूच राहणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात १०० कोरोनाचे रुग्ण दाखल आहेत. तेथील क्षमता संपल्याने आता औंध येथील रुग्णालयात नव्या रुग्णांना हलविण्यात येणार आहे. रुग्णांची संख्या कितीही अगदी २५ हजारापर्यंत वाढली तरी पुणे महापालिकेची त्यांच्यावर उपचार करण्याची क्षमता आहे. मात्र हा आकडा वाढू द्यायचा नसेल निर्बंध घालण्याशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी सांगितले
दरम्यान, पुण्यातील कोरोना रुग्णांचा आकडा आता ११९ वर पोहोचला आहे. पुणे शहराच्या हद्दीत ९० तर ग्रामीण भागामध्ये आठ कोरोना रुग्ण आढळून आलेत. या रुग्णांपैकी चौघेजण अत्यवस्थ असून पाच जणांचा मृत्यू झालाय. तर आतापर्यंत पंधरा जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. पुणे शहरातील सायंकाळी पाच वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

सद्यस्थितीला ९९ रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नायडू रुग्णालयात सर्वाधिक ६६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ससून रुग्णालयात २१ रुग्ण दाखल आहेत. तर उर्वरित रुग्णांवर वेगवेगळ्या आठ खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com