‘अर्बन’बँक घोटाळाप्रकरणी खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका
Featured

‘अर्बन’बँक घोटाळाप्रकरणी खंडपीठात दोन वेगवेगळ्या याचिका

Sarvmat Digital

डॉ. नीलेश शेळके यांचा संबंध : तत्कालीन अध्यक्षांच्या अडचणी वाढल्या

अहमदनगर (प्रतिनिधी) – एम्स हॉस्पिटलशी निगडीत कर्ज घोटाळ्यांची मालिका आता अर्बन बँकेपर्यंत पोचली आहे. अर्बन बँक कर्ज घोटाळाप्रकरणी दोन वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या आहेत. राहुरीतील डॉ. भास्कर सिनारे, श्रीरामपूर डॉ. रवींद्र कवडे, नगरमधील डॉ. विनोंद श्रीखंडे या तिघांची एक आणि राहाता येथील व्यावसायिक संदीप वाघमारे यांनी या याचिका दाखल केल्या आहेत. या दोन्ही घोटाळ्यांची रक्कम 30 कोटीपर्यंत आहे. डॉ. सिनारे, डॉ. कवडे व डॉ. श्रीखंडे यांची 18 कोटींची रुपयांची, तर व्यावसायिक वाघमारे यांची 12 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांची याचिका आहे.

एम्स हॉस्पिटलसाठी मशिनरी खरेदी करण्यासाठी अर्बन बँकेत डॉ. सिनारे, डॉ. कवडे, डॉ.श्रीखंडे यांच्या नावे 18 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. यात हॉस्पिटलकडून कोणत्याही मशिनीची खरेदी झालेल्या नाहीत. केवळ आमच्या नावाने कर्ज काढून डॉ. शेळके, अर्बन बँकेच्या तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाने फसवणूक केल्याचा दावा डॉ. सिनारे यांनी केला होता. याप्रकरणी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात 27 ऑगस्ट 2019 रोजी तक्रार अर्ज दिलेला असून, तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत आहे. मात्र, अद्याप ही गुन्हा दाखल झालेला नसल्यामुळे डॉ. सिनारे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर काल सोमवारी (दि. 17) सुनावणी झाली. त्यात हे प्रकरण बँकेच्या कर्जाशी निगडीत असलेल्यांना प्रशासकीय यंत्रणांना 11 मार्चपर्यंत म्हणणे मांडण्याचा आदेश खंडपीठाने दिले आहेत.

दरम्यान, राहाता येथील व्यावसायिक वाघमारे यांनी व्यावसाय वृद्धीसाठी अर्बन बँकेकडे चार कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती. त्यावेळी मला 12 कोटी रुपये कर्ज घ्या, असे डॉ. शेळके आणि तत्कालीन अध्यक्षांकडून सांगण्यात आले, असा दावा वाघमारे यांनी याचिकेद्वारे केला आहे. या 12 कोटींमधील 8 कोटी आम्ही वापरतो आणि ते व्याजासहीत कर्ज खात्यावर भरू, असे आश्वासन त्यांनी त्यावेळी दिले होते. व्यावसायासाठी सुलभतेने कर्ज मिळत असल्याने हा कर्ज व्यवहार झाला.

परंतु गेल्या दोन वर्षात कर्ज खात्यात या दोघांकडून एकही रुपया भरला नसल्याचा दावा वाघमारे यांनी याचिकेत केला आहे. कर्ज फसवणूक झाल्याची तक्रार वाघमारे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील केली आहे. मार्च 2019 मध्ये ही तक्रार त्यांनी दाखल केली होती. त्यावर कार्यवाही झाली नसल्याने वाघमारे यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. या याचिकेची दखल औरंगाबाद खंडपीठाने 3 फेब्रुवारीला घेतली. खंडपीठाने 12 फेब्रुवारीला नोटिसा काढल्या असून, पुढील सुनावणी 17 मार्चला होणार असल्याची माहिती वाघमारे यांनी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com