भांडखोर, पानटिवळा, मानमोडी नगरी आभाळात…

jalgaon-digital
3 Min Read

जिल्हास्तरीय वार्षिक गणनेत आढळले पाच दुर्मिळ पक्षी

अहमदनगर (प्रतिनिधी) – मोठ्या तलावांत पाणीपातळी चांगली असल्याने नगर जिल्ह्यात येणार्‍या पक्षांचे प्रमाण कमालीचे घटले . असं असलं तरी यंदा नगरच्या आभाळी पितकंठी चिमणी, शृंगी घुबड, भांडखोर पाणलावा, पाणटिवळा, मानमोडी हे पाच दुर्मिळ पक्षी आढळून आले. पक्षी अभ्यासक जयराम सातपुते यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षी निरीक्षकांनी केलेल्या पक्षीगणनेत ही नोंद झाली.

जिल्ह्यातील पक्षांची गणना करण्यासाठी दरवर्षी जिल्हास्तरीय पक्षीयगमना होते. जिल्हा निसर्गप्रेमी संघटना तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र, तसेच विविध पर्यावरण मित्र संघटनांच्या सहकार्याने जिल्हाध्यक्ष व निसर्ग अभ्यासक जयराम सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या पक्षीगणना प्रक्रियेत अनेक निरीक्षणे नोंदविण्यात आली.

14 तालुक्यांतील 262 प्रौढ निरीक्षकांसह सुमारे 2400 विद्यार्थ्यांनी जिल्हाभरातील 810 ठिकाणी ही पक्षीगणना करून 167 प्रजातींच्या सुमारे 1 लाख 80 हजार पक्षांची नोंद घेण्यात आली. पाथर्डी तालुक्यातुन 40 प्रौढ निरीक्षकांसह 501 विद्यार्थ्यांनी 159 ठिकाणी गणना करून जिल्ह्यात यावर्षीही सर्वाधिक सहभाग नोंदवला, तर शेवगाव तालुक्यामध्ये पक्षांच्या प्रजातींमध्ये सर्वाधिक जैवविविधता आढळून आली.

यावर्षी जिल्ह्यातील मोठ्या तलावांमध्ये पाण्याची पातळी जास्त राहिल्यामुळे परदेशी पक्षांचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घटलेलेले आढळुन आले असले तरी फ्लेमिंगो, पट्टकदंब या आकर्षक व शांतताप्रिय परदेशी पक्षांनी शहरांनजीकच्या छोट्या तलावांवर अनेकवर्षांनंतर हजेरी लावल्याचेही निदर्शनास आले. ही पक्षीनिरीक्षकांसाठी आनंदाची बाब ठरली.

या उपक्रमात यावर्षीही सहभागी झाले वाढताच राहिल्याने जिल्ह्याच्या पक्षीयादीत आणखी 5 नवीन प्रजातींच्या पक्षांची भर पडली. यामध्ये पितकंठी चिमणी, शृंगी घुबड, भांडखोर पाणलावा, पाणटिवळा, मानमोडी अशा आगळ्यावेगळ्या दुर्मिळ प्रजातींच्या पक्षांची छायाचिञांसह नोंद घेण्यातही निरीक्षकांना यश आले.

पक्षीगणना उपक्रमामध्ये जयराम सातपुते, शिवकुमार वाघुंबरे, संदीप राठोड. सचिन चव्हाण, प्रतिम ढगे, भैरवनाथ वाकळे, डॉ.नरेंद्र पायघन, डॉ.अतुल चौरपगार, संतोष टकले, शैलजा नरवडे, विजय शेंगाळ, विक्रांत मते, सु्धीर दरेकर, बाळासाहेब डोंगरे, नारायण मंगलारम, राजेंद्र बोकंद, विद्याताई उदावंत, संजय बोकंद, अनिता सासणे, शशिभैय्या त्रिभुवन, अनमोल होन, डॉ.वसुदेव साळुंके, फौझिया पठाण, मिलींद जामदार, संदीप भालेराव, संपदा ससे या पक्षीनिरीक्षकांसह अनेकांनी सहभाग नोंदविला.

पक्षीगणनेत तोईपोपट, तुरेवाला चंडोल, थापट्या, जांभळी पाणकोंबडी, पट्टकदंब, पितकंठी चिमणी, लालछातीचा माशिमार, लालसरी, पाणकावळा, मुग्धबलाक, पाणटिवळा, कमळपक्षी, वारकरी, शिक्रा, राखी खाटिक, नदीसुरय, भांडखोर पाणलावा, पावशा, डोंबारी, मानमोडी आदी पक्ष्यांची नोंद झाली.

पुर्वी जिल्ह्यात उत्तम संख्येत नोंद होत असलेले पण गेल्या तीन वर्षात नगण्य प्रमाणात नोंद होत असलेल्या 5 पक्षांची नावेही या संस्थेने जिल्ह्याच्या रेडलिस्टमध्ये जाहीर केली असुन यात टकाचोर,शामा, दयाळ,गव्हाणी घुबड व जांभळा बगळा आदींचा समावेश केला आहे.ज्या ठिकाणी तुरळक प्रमाणात हे पक्षी आढळले तेथे त्यांच्या संवर्धनासाठी विशेष उपक्रम व जनजागृतीही केली जाणार आहे- श्री.जयराम सातपुते.(निसर्गअभ्यासक)

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *