दारू सुरू करणे म्हणजे ‘सरकारची विनाशकाले विपरित बुद्धी’
Featured

दारू सुरू करणे म्हणजे ‘सरकारची विनाशकाले विपरित बुद्धी’

Sarvmat Digital

अण्णा हजारे यांची सरकारच्या निर्णयावर टीका

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अद्याप बरीच कामे करणे बाकी असताना केवळ महसूल मिळावा, म्हणून दारूची दुकाने सुरू करणे ही सरकारची विनाशकाले विपरित बुद्धी आहे, या शब्दांत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सरकारला फटकारले आहे.

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात राज्य सरकारने वाईन शॉप उघडण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयाला हजारे यांनी विरोध दर्शवला आहे. दारू ही काही जीवनावश्यक गोष्ट नाही. ती मिळाली नाही तर लोक उपाशी मरणार नाहीत. मग सरकारला असा निर्णय अचानक का घ्यावा लागला? सध्याच्या परिस्थितीत सरकार दारू विक्री करून काय साध्य करणार? दारूतून मिळणार्‍या महसुलापेक्षा करोनाचा धोका अधिक वाढणार असेल तर याचा काय उपयोग? गेले महिना दीड महिना दारू विक्री बंद होती.

दारू न पिल्यामुळे कोणते नुकसान झाले? उलट दारू मिळत नसल्यानं नाइलाजाने का होईना लोक दारूपासून परावृत्त होऊ लागले होते, असं हजारे यांनी म्हटलं आहे. तुम्ही लोकांना वाचवण्याचा विचार करणार की महसूल गोळा करण्याचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात उपासमार होत असलेल्या गरीब लोकांना रेशन व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यास सरकारनं प्राधान्य द्यायला हवं. सध्या हातावर पोट असलेली हजारो कुटुंबं बेरोजगार झाली आहेत. त्यांना रेशन नाही. इतर कोणताही आधार नाही. त्यांना आधार द्यायचा सोडून सरकार नशाबाजांची हौस भागविण्यासाठी दारुची दुकाने उघडून देत आहे हे दुर्दैव आहे,अशी खंत हजारे यांनी व्यक्त केलीय.

अनेक वर्षांपासून मी शासनाकडे दारुबंदीसाठी आग्रह धरत आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना दारुबंदीचा कायदा करण्यात आला होता. त्यानुसार गावातील महिलांनी आडव्या बाटलीच्या बाजूने कौल दिला तर दारुबंदी करण्याची तरतूद आहे. तसेच मागील सरकारच्या काळातही वेळोवेळी आग्रहपूर्वक प्रयत्न करून अवैध दारू व्यवसाय रोखण्यासाठी ग्रामरक्षक दलाचा कायदा करण्यात आलेला आहे.

दारूमुळे भांडण-तंटे, मारामार्‍या, चोर्‍या, महिलांवरील अत्याचार अशी गुन्हेगारी वाढत आहे. लॉकडाऊनच्या काळात दुकाने बंद असल्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे घटल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत दारुची दुकाने उघडणे आजिबात योग्य नव्हते, असे हजारे यांनी म्हटले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com