पशुसंवर्धन विभाग करणार ‘करोना’विषयी जनजागृती : गडाख
Featured

पशुसंवर्धन विभाग करणार ‘करोना’विषयी जनजागृती : गडाख

Sarvmat Digital

पशुधनसेवेचा आणि नोंदणीचे शुल्क वाढविण्याचा ठराव

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या ‘करोना’ व्हायरसच्या अफवेमुळे कोंबड्यांची विक्री जवळपास बंद झाली आहे. यामुळे कुुक्कुट पक्षी व्यावसायिक यांच्यासोबत काही प्रमाणात शेतकरी अडचणीत आले आहेत. राज्यात दररोज 120 कोटी रुपयांचा फटका कुक्कुट व्यवसायाला बसला असून हीच परिस्थिती नगर जिल्ह्यात आहे. वास्तवात चीनमधील करोना व्हायरस आणि कोंबड्या याचा काडीचाही संबंध नसल्याचे जिल्हा परिषद अर्थ व पशूसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेची पशुसंवर्धन विभागाची मासिक बैठक सोमवारी जिल्हा परिषदेत सभापती गडाख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सध्या जगात केवळ करोना व्हायरसची चर्चा सुरू आहे. व्हायरसने बाधितांची संख्या वाढत असून यामुळे नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकरी आणि कुक्कुट पक्षीपालकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

यामुळे गेल्या काही दिवसांत काेंंबड्याची विक्रीची थांबली आहे. सोशल मीडियावर ‘करोना’बाबत चुकीची माहिती प्रसारित करण्यात येत आहे. यामुळे कोंबडीचे मास खाल्यास करोनाचा धोका असल्याची चर्चा समितीच्या बैठकीत करण्यात आली. मात्र, असा कोणताच प्रकार जिल्ह्यात नसून कोंबडीचे मांस खाण्यास पूर्णपणे सुरक्षित असल्याचा खुलासा जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तंबारे यांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग ग्रामीण भागात करोना व्हायरस विषयी जिल्ह्यात जनजागृती करणार आहे. याबाबतच्या स्पष्ट सुचना सभापती गडाख यांनी विभागातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे आपल्याकडे कोणतेही मांस हे 56 डिग्री तापमानावर शिजवल्यावर खाण्यात येत असल्याने या तापमानात कोणत्याच व्हायरस तग धरत नसल्याचे डॉ. तुंबारे यांनी सांगितले. यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पुरविण्यात येणार्‍या लसीकरण सेवा, पशुधनावर करण्यात येणारा उपचार, खच्चीकरण आणि उपचारांपोटी केवळ 1 रुपया सेवा शुल्क आकारण्यात येत असून हा शुल्क पाच रुपये केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार असून त्याचा उपयोग पशूसंवर्धन विभागाच्या दवाखान्यांना होणार आहे.

यामुळे हा सेवाशुल्क पाच रुपये करून तो राज्य सरकारकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पशुसंवर्धन विभागकडून आकारण्यात येणार्‍या शुल्कातून जमा होणार्‍या निधीतून संबंधित दवाखान्यांचा स्टेशनरी, वीज बिल, पाणीपट्टी, घरपट्टी आणि अन्य खर्च भागविण्यात येत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला सदस्य संध्या आठरे, सोनाली रोहमारे, वंदना लोखंडे, दिनेश बर्डे आदी उपस्थित होते.

मार्च अखेरपर्यंत जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात येणार्‍या आदर्श गोपालक पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना समितीच्या बैठकीत देण्यात आल्या आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com