देवदूतांना साई जीवनदूत पुरस्काराने गौरविणार
Featured

देवदूतांना साई जीवनदूत पुरस्काराने गौरविणार

Sarvmat Digital

पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांची संकल्पना

शिर्डी (शहर प्रतिनिधी) – साईबाबांच्या रुग्णसेवेचा वारसा जोपासण्यासाठी शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर वाहतूक पोलीस कक्षाचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या संकल्पनेतून शिर्डी शहरात अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना उपचारार्थ रुग्णालयात तातडीने दाखल केलेल्या देवदूतांना साईजीवन दूत पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या साईबाबांच्या शिर्डी नगरीत वर्षभरात देश-विदेशातून करोडो भाविक दर्शनासाठी येत असतात. यादरम्यान अपघातग्रस्त जखमींंसाठी जिवाची पर्वा न करता धाऊन जाऊन तातडीने रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेल्या दूतांना शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी शहर वाहतूक पोलीस कक्षाचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या संकल्पनेतून साई जीवनदूत पुरस्काराने सन्मानित करून प्रशस्तीपत्र देण्यात येईल अशी सर्वानुमते उपक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.

दरम्यान काल बुधवार दि. 26 रोजी शिर्डी पोलीस अतिथी गृहावर पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला. या बैठकीस शिर्डी पोलीस ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, वाहतूक कक्षाचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे, शिर्डी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले, सुर्योदय बँक शिर्डी शाखेचे व्यवस्थापक राहुल शिंपी आदीसह शिर्डीतील प्रवासी वाहतूक संघटनेचे तसेच ट्रॅव्हल्स एजंट मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या संकल्पनेची मुहूर्तमेढ शिर्डी येथून होणार असल्याने हा साई जिवंत पॅटर्न जिल्ह्यासह राज्यात राबविण्यासाठी सामाजिक संस्था मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतील आणि शिर्डी नगरीचे नाव राज्यातच नव्हे तर देशभरात पोहोचण्यास मदत होईल असा विश्वास पोलिस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी व्यक्त केला. पोलिसांप्रती सर्वसामान्य नागरिकांच्या मनातील भीती या माध्यमातून कमी होण्यास मदत होणार आहे.

जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याने त्यांचा जीव वाचणार आहे एक प्रकारे या साई जीवनदूत संकल्पनेच्या माध्यमातून साक्षात परमेश्वराचे दर्शन घडणार आहे. यामध्ये शहरातील ट्रॅव्हल एजंट यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. यावेळी पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी उपस्थितांना या संकल्पनेतून शिर्डीत येणार्‍या निराधार माणसाला मदत मिळेल आणि मदत करणार्‍यांचा यथोचित सन्मान केल्याने त्यांचा आत्मविश्वास उंचावणार असल्याचे सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com