कर्मचार्‍याला मारहाण झाल्याने अत्यावश्यक सेवा धोक्यात
Featured

कर्मचार्‍याला मारहाण झाल्याने अत्यावश्यक सेवा धोक्यात

Sarvmat Digital

महापालिका कर्मचारी युनियन आक्रमक : वर्मी घाव लागल्याने एक जण गंभीर

अहमदनगर (प्रतिनिधी) – फवारणी करण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या दोन कर्मचार्‍यांना बेदम मारहाण केल्यामुळे महापालिका कर्मचारी युनियन आक्रमक झाली असून, अत्यावश्यक सेवा बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सायंकाळी उशीरापर्यंत युनियन आणि महापालिका प्रशासन यांच्यात निर्णय झालेला नव्हता. दरम्यान, मारहाण झालेले कर्मचारी सुरेश वाघ गंभीर आहे. दोन्ही कर्मचार्‍यांवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेतर्फे शहरात निर्जंतुकीकरणासाठी औषध फवारणी सुरु आहे. जीव धोक्यात घालून कर्मचारी फवारणी करत आहेत. बुधवारी (दि. 1) नागापूर परिसरात फवारणीचे काम सुरु असतांना महापालिकाच्या दोन कर्मचार्‍यांना नगरसेविकेच्या नातेवाईकांसह सात ते आठ जणांकडून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात निलेश भाकरे व त्याचे सात ते आठ साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारहाणीत महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक सुरेश वाघ आणि अविनाश हंस जखमी झाले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दररोज रात्री दोन-तीन वाजेपर्यंत औषध फवारणीचे काम सुरू असते. नागापूर गावठाण येथील महापालिका कार्यालयाजवळ काही कर्मचारी मध्यरात्री एक वाजता फवारणी करत होते. त्यावेळी तेथे निलेश भाकरे व त्याचे आठ सहकारी आले. ‘आमच्या हिशोबाने फवारणी करा’ असे त्यांनी सांगितले, मात्र त्यास कर्मचार्‍यांनी नकार दिला. याचा राग आल्याने त्यांनी कर्मचार्‍यांकडील पाईप हिसकावून घेऊन त्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यामध्ये वाघ आणि हंस जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सुरूवातीला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, भाकरे आणि त्याच्या आठही अनोळखी सहकार्‍यांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणारे सर्वजण दारुच्या नशेत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवन सुपनर करत आहेत.
औषध फवारणी सुरू असताना स्वच्छता निरीक्षकांना झालेल्या मारहानीचा महापालिका कामगार युनियनने निषेध केला आहे. तसेच संबंधितांवर कठोर कारवाई होईपर्यंत आणि अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या मनपा कर्मचार्‍यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत सर्व अत्यावश्यक सेवा बंद करण्यात आल्याची माहिती कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे यांनी दिली.

वाघ व हंस या दोघांना मारहाण करणारे शिवसेना नगरसेविकेच्या नातेवाईक असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांची भेट घेऊन चर्चा केली. शहरात संचारबंदी लागू असतानाही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दारू पिऊन फिरताहेत. अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आल्यामुळे सर्व कर्मचार्‍यांत भीतीचे वातावरण आहे. या आरोपींचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. शहर अभियंत्यांवर बूटफेक प्रकरणातही हे आरोपी होते. पोलिसांकडून अद्याप त्यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही. या सर्वांवर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.

कलम 144 चे उल्लंघन करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, आदी गुन्हे वाढवावेत. मनपा आयुक्तांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांशी व जिल्हाधिकार्‍यांशी यासंदर्भात चर्चा करावी. कर्मचार्‍यांना सुरक्षेची हमी मिळेपर्यंत अत्यावश्यक सेवा बंदच राहतील, असा निर्णय युनियन घेतला असल्याचे अनंत लोखंडे यांनी आयुक्तांना सांगितले.
दरम्यान, दोन्ही कर्मचारी खासगी रूग्णालयात उपचार घेत असून त्यातील एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. मनपा आयुक्त, उपायुक्त व सर्व प्रमुख अधिकार्‍यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली.

सदरची घटना निषेधार्ह असून महापालिकेने याची गंभीर दखल घेतली आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांना सेवा पुरवण्यासाठी कर्मचारी जीव धोक्यात घालून अत्यावश्यक सेवा पुरवित आहेत. अशा काळात सर्वांनी महापालिकेला सहकार्य करणे आवश्यक आहे. कामगार युनियन अध्यक्षांनी अत्यावश्यक सेवा बंद करण्याबाबत सूचना दिलेली आहे. मात्र आपत्कालीन परिस्थितीत असा निर्णय योग्य नाही. या संदर्भात कर्मचारी व युनियनच्या पदाधिकार्‍यांशी पुन्हा एकदा चर्चा करणार आहे. पोलिस प्रशासन, जिल्हाधिकारी यांच्याशी यासंदर्भात चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे आयुक्त श्रीकांत मयकालवार यांनी सांगितले.

फवारणी ठरतेय फोटोसेशन
प्रभागात ठिकठिकाणी फवारणी होणे गरजेचे आहे. मात्र हे करत असताना अगोदर कोरोना रूग्ण किंवा संशयित सापडले अशा ठिकाणांना प्राधान्य देण्याची गरज आहे. प्रत्येक नगरसेवक अगोदर माझ्या प्रभागात फवारणी करावी, यासाठी महापालिका प्रशासनावर दडपण आणत आहेत. एवढेच नव्हे तर फवारणीचा पाईप हातात घेऊन आपल्या छब्या वर्तमानपत्रात देण्यासाठीही स्पर्धा लागली आहे. अत्यावश्यक सेवेतही प्रसिद्धीची हौस भागवून घेतली जात आहे. रात्रीचा प्रकार याच हौसेच्या प्रेमात पडण्याच्या प्रकारातून झाल्याचे मानले जाते.

त्यांचे अवैध धंदेही आहेत : आ. जगताप
महापालिका कर्मचार्‍यांना मारहाण करणार्‍या गुंडांवर कारवाई झालीच पाहिजे. या गुंडांचे संबंधित भागात अवैध धंदेही आहेत. या सर्वांवरच आता कारवाई होईल. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना हा प्रकार सांगण्यात येईल. मात्र शहरातील अत्यावश्यक सेवा बंद होता कामा नये. महापालिका कर्मचारी युनियनने असा निर्णय घेऊ नये, यासाठी त्यांच्यासमवेत चर्चा केली जाईल, असे आ. संग्राम जगताप यांनी म्हटले आहे. त्यांनी जखमी कर्मचारी सुरेश वाघ यांची रूग्णालयात जाऊन विचारपूस केली.

Deshdoot
www.deshdoot.com