स्थायी सभापतिपदासाठी घड्याळाचे काटे जोरात
Featured

स्थायी सभापतिपदासाठी घड्याळाचे काटे जोरात

Sarvmat Digital

रिक्त जागांवर सदस्य नियुक्तीचीच राष्ट्रवादीला प्रतिक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी) – राष्ट्रवादीने महापालिका स्थायी समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वतोपरी तयारी केली असून, आता फक्त समितीच्या रिक्त जागांवर सदस्य नियुक्तीची प्रतिक्षा आहे. यामध्ये सर्वाधिक पंचाईत बसपची झाली असून, माजी सभापती सचिन जाधव यांच्या पत्नी अश्विनी जाधव यांना केवळ आश्वासनावरच तग धरावी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीसह सर्वच पक्षात समितीमध्ये जाण्यासाठी चूरस निर्माण झाली आहे.

फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात महापालिका स्थायी समितीतील आठ सदस्य निवृत्त झाले. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी तीन आणि भाजप व काँग्रेसचा प्रत्येकी एक असे आठ सदस्यांचा समावेश होता. या रिक्त जागांवर नवीन सदस्य नियुक्त करताना पक्षीय बलानुसारच करण्यात येणार असले, तरी यावेळी त्यात फरक होईल. प्रभाग सहामधील पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाल्यामुळे त्यांची महापालिकेतील संख्या एकने घटली. परिणामी त्यांचे मूल्य घटले. त्यामुळे स्थायी व महिला बालकल्याण समितीमध्ये त्यांचे पूर्वी असलेले सहा सदस्यांमध्ये घट होऊन तेथे आता प्रत्येकी पाच सदस्य राहतील.

पोटनिवडणुकीत भाजपचा विजय झाल्याने त्यांचे महापालिकेतील संख्याबळ एकने वाढले. त्यामुळे त्यांच्या मुल्यातही वाढ झाल्याने स्थायी व महिला बालकल्याण समितीमध्ये या पक्षाचा एक सदस्य वाढणार आहे. शिवसेनेचे पहिले सहा होते, ते पाच होणार आणि भाजपचे तीन होते, ते चार होतील. मात्र पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या पल्लवी जाधव यांचे नाव भाजपच्या गटनोंदणीत आल्यानंतरच हे शक्य आहे. यासाठी अगोदर गटनोंदणी आणि नंतरच सदस्य नियुक्तीसाठी सभा, अशी भाजपची भूमिका आहे. नवीन निवडून आलेल्या नगरसेवकाचे नाव राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर गटनोंदणी करण्यात येणार असल्याचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

दुसरीकडे तातडीने स्थायी समिती सदस्य नियुक्त करावेत, यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. या पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक गणेश भोसले यांनी तसे पत्रही दिले आहे. तसेच रिक्त जागांवरील नियुक्त्या किती दिवसात करायच्या, याबाबत काही नियमावली आहे का, याचीही विचारणा त्यांनी केली आहे. स्थायी समितीमध्ये रिक्त झालेल्या जागांवर महिनो न महिने नियुक्त्या न करण्याचे कसब महापालिकेत अवलंबले जाते. विशेष म्हणजे याची सुरूवात राष्ट्रवादीनेच केलेली आहे. असे असताना आता याच पक्षाचे नगरसेवक नियमावलीची विचारणा करत असल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

महापालिकेत भाजपला पाठिंबा देताना सत्तेत सहभागी व्हायचे नाही, असे राष्ट्रवादीने ठरविले होते. अर्थात ते अलिखित आहे. पहिले पूर्ण वर्ष ते सत्तेत सहभागी झाले नसले, तरी महापालिकेतील सत्तेवर त्यांचाच प्रभाव होता, हे वारंवार समोर आले आहे. मात्र प्रभाव असणे आणि प्रत्यक्ष पदावर असणे, यात बराच फरक आहे.

त्यामुळे आता वर्षभर थांबल्यानंतर सत्तेत सहभागी होण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यातही स्थायी समितीसारख्या महत्त्वाच्या समितीचे सभापतिपद हाती येत असल्यास कोणाला नको आहे? त्यामुळे आता स्थायी समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली वेगाने होत आहेत. शिवसेनेचा पाठिंबा मिळाला तर महाविकास आघाडी किंवा भाजपचा पाठिंबा मिळाला तर महापालिकेतील सत्ताकारण असे सांगून वेळ निभावण्यात येणार असल्याचे समजते.

भाजपला गटनेतेपदाचे ग्रहण
मागील पाच वर्षे महापालिकेत गटनेतेपदाचा वाद रंगला. त्यात भाजपमधील वाद सर्वात विकोपाला गेला होता. अखेर महापालिकेची निवडणूक आल्यानंतर भाजपच्या गटनेत्याने पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेला जवळ केले. यावेळीही पुन्हा हा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. स्वीकृत सदस्य नियुक्तीसाठी मध्यंतरी झालेल्या प्रकारात भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झालेले आहेत. यात आता गटनेते असलेल्या उपमहापौर मालन ढोणे यांचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडील गटनेतेपद काढून घेण्याच्या हालचाली आहेत. पोटनिवडणुकीनंतर नव्याने गटनोंदणी करावी लागणार असल्याने त्यावेळी ही खेळी करण्याचे घाटत आहे. भाजपच्या दुसर्‍या गटाचा मात्र यास विरोध आहे. या वादामुळे गटनोंदणी रखडली जाऊ शकते. तसे झाल्यास रिक्त जागांवर सदस्य नियुक्तीसाठीची सभा देखील लांबू शकते. असे झाल्यास राष्ट्रवादी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com