सत्तेचा श्रीगणेशा !
Featured

सत्तेचा श्रीगणेशा !

Sarvmat Digital

शिवसेना- 06, राष्ट्रवादी- 05, भाजप- 03, बसपा- 01, काँग्रेस- 01

राष्ट्रवादी सभापतीपदासाठी आग्रही । शिवसेना सत्तेबाहेरच

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या राजकारणात वर्षभर सत्तेबाहेर राहिलेली राष्ट्रवादी आता स्थायी समिती ताब्यात घेण्याची तयारी करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य असले तरी याही खेपेला सेनेची संधी हुकण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भाजपच्या मदतीने तिजोरीच्या चाव्या खिशात टाकून महापालिकेत सत्तेचा श्रीगणेशा करण्याच्या तयारीत राष्ट्रवादी असल्याचे समजते. त्यासाठी गणेश भोसले, कुमारसिंह वाकळे यांची नावे सभापती पदासाठी चर्चेत असल्याचे समजते.

सार्वत्रिक निवडणुकीनंतर महापौर पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपने महापालिकेची सत्ता काबीज केली. सर्वात मोठा पक्ष असूनही (23 नगरसेवक) शिवसेनेला विरोधी बाकावर बसावे लागले. अवघ्या चार नगरसेवकांच्या जोरावर बसपाच्या हत्तीने स्थायी समिती सभापती पदाची खुर्ची मिळविण्यात बाजी मारली. वर्षभरानंतर स्थायी समितीचे निम्मे सदस्य निवृत्त झाले. नव्याने सदस्य नियुक्त केल्यानंतर सभापती पदाची निवडणूक होणार आहे.

वर्षभर सत्तेबाहेर असलेल्या राष्ट्रवादीने आता स्थायी समितीचे सभापती मिळविण्यासाठी तयारी सुरू केली आहे. महापौर पदावेळी राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची परतफेड स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीवेळी करून उतराई होण्याचा चान्स भाजपला यानिमित्ताने मिळणार असून ते मदत करतील अशी आशा राष्ट्रवादीला आहे. त्याच जोरावर राष्ट्रवादीने महापालिका तिजोरीचा मालक असलेला सभापती पद पदरात पाडण्याची तयारी चालविली आहे.

आमदार मिसेससह भोसले, वाकळेंची रेस
राष्ट्रवादीकडून सभापती पदासाठी गणेश भोसले, कुमारसिंह वाकळे यांच्यासोबतच आमदार संग्राम जगताप यांच्या मिसेस शीतल याही दावेदार आहेत. भोसले, वाकळे हे स्थायीचे विद्यमान सदस्य आहेत. राष्ट्रवादीचे तीन सदस्य नव्याने स्थायी समितीत नियुक्त केले जाणार आहेत. त्यात शीतल जगताप यांची वर्णी लागली तर त्या सभापती पदाच्या दावेदार होतील असे सूत्रांकडून सांगण्यात आले. जगताप स्थायी समितीत न आल्यास मात्र भोसले किंवा वाकळे यांच्यापैंकी एकाला सभापती पदाचा चान्स मिळणार आहे.

काँग्रेसकडून वारे, जाधवांपैंकी एक
स्थायी समितीतून काँग्रेसच्या नगरसेविका संध्याताई पवार या निवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या जागी काँग्रेसचा नवा सदस्य नियुक्त केला जाणार आहे. सुप्रिया जाधव या काँग्रेसच्या गटनेत्या असून त्या किंवा रुपाली वारे या दोघींची नावे स्थायी समिती सदस्यासाठी चर्चेत असल्याचे समजते. शीला चव्हाण आणि रिजवाना शेख या काँग्रेसच्या नगरसेविका असल्या तरी त्यांची नावे चर्चेत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आघाडी की बिघाडी
राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी असून नगरी राजकारणात तिचा प्रयोग झाला तर सेनेचा सभापती होऊ शकतो. शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य स्थायी समितीमध्ये असले तरी स्थानिक राजकारण पाहता शिवसेनेला सभापती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी मदत करेल की नाही याबाबत साशंकता आहे. शिवसेनेशिवाय सभापती होणे शक्य असल्याची बाब राष्ट्रवादीचे नेते प्रदेश नेत्यांच्या निदर्शनास आणून देत सभापती पद मिळवतील. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात आघाडीत बिघाडी होण्याचेच चिन्हे आहेत. जरी आघाडी झाली सेनेला सभापती पदावर पाणी सोडावे लागेल. तसे झाले तर सभापती पदाची निवडणूक बिनविरोधही होऊ शकते.

Deshdoot
www.deshdoot.com