Thursday, April 25, 2024
Homeनगर..अन् महापालिका सभेचा अजेंडा टराटरा फाडून फेकला

..अन् महापालिका सभेचा अजेंडा टराटरा फाडून फेकला

कोरोनाच्या वातावरणात सभा ठेवण्याचे राजकीय मनसुबे उधळले

अहमदनगर (प्रतिनिधी) – एकाच ठिकाणी जास्त लोक जमू नयेत म्हणून उद्याने, हॉटेल्स, चौपाट्या बंद करण्याचे आदेश देणारे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी मात्र महापालिका स्थायी समितीच्या रिक्त जागांवर नियुक्त्या करण्यासाठी सर्वसाधारण सभा काढली. प्रभारी नगरसचिव एस. बी. तडवी यांनी महापौरांच्या आदेशामुळे त्यावर स्वाक्षरीही केली. मात्र आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी डोळे वटारताच सभेचा अजेंडा अक्षरशः फाडण्यात आला.

- Advertisement -

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून जिल्हा प्रशासन सतर्क आहे. लोकांनी एकत्रित येऊ नये, असे वारंवार आवाहन केले जात आहे. गर्दीचे कार्यक्रम रद्द करण्याचे आवाहन केले जात आहे. विविध संस्था, संघटनांनी जिल्हा प्रशासनाचे आवाहन स्वीकारून आपले कार्यक्रम रद्द केले. एवढेच नव्हे, तर जिल्हा परिषदेची अर्थसंकल्पीय सभा देखील कोरोनामुळे अनिश्‍चित आहे. असे असताना शहराचे महापौर वाकळे यांनी मात्र स्थायी समितीमध्ये रिक्त जागांवर सदस्य नियुक्त करण्यासाठी 23 मार्चला सभेचे आयोजन केले होते.

या जागा तातडीने भराव्यात यासाठी नगरसेवकांचा त्यांच्यावर दबाव आहे. राजकीय सोय व्हावी, यासाठी ही धावपळ आहे. काहींचा स्थायी समितीच्या सभापतिपदावर डोळा आहे. समितीत जाऊ इच्छिणारे आणि सभापतिपद मिळविण्यासाठी घाई झालेल्यांनी महापौरांना आग्रह केला. राजकीय आग्रहाला बळी पडत महापौरांनी सभा निश्‍चित केली. मात्र हे करत असताना कोरोनासारख्या भयंकर आजाराच्या प्रादुर्भावाचा विचार झाला नसल्याचे समोर आले.

मंगळवारी दुपारी सभेचा अजेंडा तयार होता. तडवी यांनी त्यावर स्वाक्षरीही केली होती. अजेंडा वाटपाची प्रक्रिया सुरू असतानाच या सभेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. विशेष म्हणजे सोमवारी कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेताना महापौर वाकळे यांनी कठोर भूमिका घेण्याचे आवाहन प्रशासनाला केले. यामध्ये उद्याने, हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या हातगाड्या (चौपाटी) बंद करण्याच्या सूचना केल्या. यासाठी कठोर व्हा, असे सुनावले. एकीकडे असे आदेश देत असतानाच दुसर्‍याच दिवशी सर्व नगरसेवकांना एकत्र आणणारी सभा घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता, ही विशेष सर्वसाधारण सभा असून, अवघ्या पाच मिनिटात ती संपेल, असे सांगत सभा काढण्याच्या निर्णयाचे समर्थन केले.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असलेला कायदा आणि उपाययोजनांसाठी प्रशासनाचे असलेले गांभीर्य लक्षात घेऊन नगरसचिव तडवी यांनी पुन्हा एकदा आयुक्त मायकलवार यांच्याशी या संदर्भात चर्चा केली. त्यांनी सभेचा अजेंडा न काढण्याच्या सक्त सूचना दिल्या. या संदर्भात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशीही चर्चा झाल्याचे समजते. या सर्व प्रक्रियेनंतर निघालेला सहीचा अजेंडा अक्षरशः फाडून फेकून देण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा विचार न करता राजकीय सोय लावण्याचा महापौर, नगरसेवकांचा मनसुबा यामुळे उधळला गेला.

आयुक्त सक्षम प्राधिकारी
राज्य सरकारने महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखम्यासाठी महापालिका आयुक्तांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा एक भाग म्हणून एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी आदेश काढण्यात आले आहेत. यामुळे आता शहरातील चित्रपटगृहांप्रमाणेच उद्याने, जॉगिंग ट्रॅक, मंगल कार्यालये यांना प्रतिबंध करण्यात आला आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधित कारवाईस पात्र ठरणार आहेत. नगर शहरामध्ये हे अधिकारी महापालिका आयुक्तांना देण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या