शिवसेनेला टाळून महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला
Featured

शिवसेनेला टाळून महापालिकेत विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला

Sarvmat Digital

संपत बारस्कर यांची नियुक्ती : नियुक्तीचा वाद न्यायालयात जाण्याची शक्यता

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीवरून भाजपने शिवसेनेला डिवचले असून, या पदावर शिवसेनेचा हक्क असतानाही मंगळवारी आ. संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे गटनेते संपत बारस्कर यांची नियुक्ती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. हा वाद पुन्हा न्यायालयात जाण्याची परंपरा यामुळे कायम राहण्याची चिन्हे आहेत.

महापालिका स्थापन झाल्यापासून एखादा अपवाद वगळता विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीचा वाद कायम न्यायालयात गेला आहे. विरोधी पक्षनेते आणि सभागृह नेते नियुक्तीचे अधिकार महापौरांना असतात. सत्ताधारी पक्षाच्या सदस्य संख्येनंतर सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या पक्षाच्या गटनेत्याची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करावी, असा नियम आहे.

मात्र या नियमाला नेहमीच हरताळ फासला गेला आहे. एकदा तर अवघे चार सदस्य असलेल्या मनसेला हे पद बहाल केले होते. सत्ताधारी पक्षाला सहकार्य करणार्‍या इतर पक्षाच्या गळ्यात ही माळ घालून खूष करण्याची पद्धत रूढ झाली आहे. याची सुरूवात शिवसेनेने केली, त्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आता भाजपही त्याच रांगेत जाऊन बसला आहे.

महापालिकेत शिवसेना (23), राष्ट्रवादी (18), भाजप (15), काँग्रेस (5), बसप (4) आणि इतर अपक्ष असे संख्याबळ आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि बसप यांनी एकत्र येत आणि काही अपक्षांना बरोबर घेत महापालिकेत सत्ता स्थापन केली आहे. शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही आघाडी करण्यात आली. राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र असले तरी येथील महापालिकेत शिवसेना बाजूला असून, भाजप जवळ आहे.

विरोधी पक्षनेता नियुक्ती करतानाचा नियम पाहता या पदावर शिवसेनेचा हक्क आहे. त्यामुळे शिवसेनेचे गटनेते रोहिणी शेंडगे यांच्या नावाचा प्रस्ताव शिवसेनेने महापौर वाकळे यांच्याकडे सादर केला होता. त्यानंतर शिवसेनेला हे पद मिळू नये म्हणून राष्ट्रवादीनेही गटनेते संपत बारस्कर यांच्या नावाची शिफारस केली होती.

वर्षभर महापालिकेत विरोधी पक्षनेते नव्हते. नियमाप्रमाणे या पदावर सर्वाधिक नगरसेवक असलेल्या शिवसेनेचा अधिकार होता. मात्र महापौर वाकळे यांनी मंगळवारी राष्ट्रवादीचे गटनेते बारस्कर यांची या पदावर नियुक्ती केली. शिवसेनेसाठी हा धक्का आहे. दुपारी बारस्कर यांना नियुक्तीचे पत्र दिल्यानंतर सायंकाळी उशीरापर्यंत शिवसेनेला याची खबरही नव्हती. शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी महापौरांची ही कृती बेकायदेशीर असल्याचे सांगितले.

तसेच याप्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात येईल, असेही सांगितले. असे असले तरी मध्यंतरी शिवसेनेचे काही नगरसेवक उपनेते अनिल राठोड यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांची राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांच्याशी जवळीक वाढू लागली आहे. त्यात स्वतः शेंडगे देखील आहेत. ज्यांचा हक्क डावलला, ते शेंडगे न्यायालयात गेले तरच दावा टिकू शकतो. त्यामुळे आ. जगताप यांच्या जवळ गेलेले शिवसेनेचे नगरसेवक शेंडगे यांना न्यायालयात जाण्यापासून परावृत्त करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

न्यायालयात दाद मागणार : शेंडगे
या पदासाठी शिवसेनेने शिफारस केलेल्या रोहिणी शेंडगे यांचे पती व माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडगे यांनी या नियुक्तीबाबत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, हा हक्क शिवसेनेचा आहे. भाजप असा खोडसाळपणा करणार, याचा अंदाज होताच. आम्ही फक्त नियुक्ती कधी होते, याची प्रतीक्षा करत होतो. आता या नियुक्तीच्या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार आहोत. राष्ट्रवादीशी जवळिक असल्यामुळे हा निर्णय घेताना कोणी चर्चा केली नाही का, असे विचारता कोणतीही चर्चा करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. तसेच जवळीक आणि हक्क हे वेगवेगळे आहे. नियमाने विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेनेचा हक्क असल्याने तो मिळविण्यासाठी न्यायालयात जाणारच, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

Deshdoot
www.deshdoot.com