कचरामुक्त झाल्याचा आव महापालिकेने आणू नये

शिवसेना जिल्हा उपप्रमुख जाधव यांची अधिकारी-पदाधिकार्‍यांवर टीका

अहमनगर (प्रतिनिधी)- स्वच्छ सर्वेक्षण अभियानात अगोदरपासूनच मागे असलेल्या अहमदनगर शहराची यावर्षी दांडी उडाली. मागील वर्षी दोन स्टार मिळवणार्‍या अहमदनगर महानगरपालिकेला यावर्षी एका स्टारवर समाधान मानावे लागले. असे असतानाही महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी नगर शहर कचरा मुक्त झाल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र घेऊन आपलीच पाठ थोपटून घेत असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीष जाधव यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी ही नगर शहराची फसवणूक असल्याचे म्हटले आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये राज्यात सर्वप्रथम येऊ पाहणार्‍या अहमदनगर महापालिकेला यावर्षी कचरा मुक्त अभियानात अवघा एक स्टार मिळाला. नगरपासून जवळच असलेल्या आणि लाखो भक्तांच्या वावराने गजबजलेल्या शिर्डीने मात्र थ्री स्टारचा दर्जा मिळवत देशात नावलौकिक राखला.

दुसरीकडे देवळाली प्रवरा पालिकेने थ्री स्टारचा दर्जा कायम राखला. या सर्वेक्षणात सहभागी पालिका महापालिकांना एक ते पाच दरम्यान गुणवत्तेनुसार कोणता ना कोणता दर्जा मिळतच असतो. या निकालाकडे पहिल्यास एखाद्या स्पर्धेत स्पर्धक पासपुरते मार्क मिळऊन सहभागाचे प्रमाणपत्र मिळवतो आणि आपण उत्कृष्ठ असल्याचे भासवतो असा, हा प्रकार असल्याची शहरात चर्चा आहे.

भाजपची सत्ता असलेल्या अहमदनगर महापालिकेने स्वच्छ अहमदनगर, सुंदर अहमदनगर, हरित अहमदनगरची घोषणा केली. मात्र या सर्वेक्षणाने धक्का दिला. केंद्र सरकारच्या माध्यमातून देशभरात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाचे हे पाचवे वर्ष होते. अभियानांतर्गत दरवर्षी जानेवारीमध्ये सर्वेक्षण होते. या अभियानात शहर हागणदारीमुक्त करणे, घनकचरा व्यवस्थापन करणे या दोन मुख्य बाबींचा समावेश असतो.

अभियानात सर्वाधिक चांगले काम करणार्‍या कचरामुक्त शहरांना तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) दिले जाते. नव्हत्याचे होते करण्याचे कागदोपत्री कसब आपल्या पालिका अधिकारी-पदाधिकार्‍यांच्या हाती असल्याचे यावरून सिद्ध झाले आहे.

या सर्वेक्षणात पालिकेला पहिल्या 6000 गुणांपैकी 700 गुण मिळाले. देशातल्या 2500 शहरांपैकी पहिल्या 147 शहरांच्या यादीत स्थान मिळवणे इतकेच समाधान महापालिकेला आहे. शहर खरंच स्वच्छ सुंदर, हरित झाले आहे का, याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचेही जाधव यांनी म्हटले आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *