Saturday, April 27, 2024
Homeनगरराब राब राबून महापालिकेला अवघा ‘वन स्टार’

राब राब राबून महापालिकेला अवघा ‘वन स्टार’

केंद्र सरकारच्या कचरामुक्त शहर सर्वेक्षणाचे मानांकन जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक महिने राब राब राबल्यानंतरही महापालिकेच्या हाती कचरामुक्त शहर सर्वेक्षणात काहीही पडले नाही. ‘वन स्टार’वरच महापालिकेच्या स्वच्छतेचा गाडा अडला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे महापालिकेचा आयुक्तपदाचा कार्यभार असताना हे सर्वेक्षण झाले होते. देशभरात स्वच्छ भारत अंतर्गत विविध सर्वेक्षणे करण्यात आली. त्यात कचरामुक्त शहरचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यात राज्यातील इतर काही महापालिकांनी दर्जेदार कामगिरी केली असताना नगरने मात्र त्याचा धडा घेतला नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

नगरच्या बरोबरीचे स्थापन झालेल्या धुळे, जळगाव, चंद्रपूर, भिवंडी महापालिकेने कचरामुक्त शहर सर्वेक्षणात थ्री स्टार मिळविला आहे. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या कंथार या संस्थेमार्फत हे सर्वेक्षण झाले होते. यासाठी कचरा वाहतुकीसाठी ठेकेदार तातडीने बदलणे, त्यासाठी जास्त वाहने लावणे, महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लावणे, विविध स्वयंसेवी संस्था, इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी देखील स्वच्छतेसाठी पुढे आले होते. शहरातील प्लॅस्टिक जमा करण्याचे काम वेगाने हाती घेण्यात आले होते. विविध बँकांनीही यात सहभाग नोंदवून कचरा मुक्तीसाठी हातभार लावला होता.

नियमित होणार्‍या या कामाचा आढावा त्यावेळी आयुक्त असलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी घेत असत. त्यांना सर्व कस छान छान चालले असल्याचे सांगण्यात येत होते. ज्या भागात स्वच्छता झाली, त्या भागाची पाहणी त्यांच्यासमवेत करण्यात येत होती. महापालिका बैठकांमध्ये सांगण्यात येणारी माहिती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती यात फरक असल्याचे वृत्त त्याचवेळी प्रकाशित झालेले होते.

मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. आता सर्वेक्षणाचे मानांकन घोषित झाल्यानंतर नगर महापालिका तोंडावर पडली आहे. यामध्ये वन स्टार, थ्री स्टार आणि फाईव्ह स्टार असे तीनच नामांकने होती. यात नगर महापालिकेला वन स्टार मिळाला आहे. मागील वर्षी वन, टू आणि थ्री स्टार असे मानांकन होते. त्यावेळी नगर महापालिकेला टू स्टार मानांकन मिळाले होते. महापालिकेचा भोंगळ कारभार या निमित्ताने पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या