Thursday, April 25, 2024
Homeनगरमहापालिका निवडणुकीतील खर्चाच्या चौकशीचे आदेश

महापालिका निवडणुकीतील खर्चाच्या चौकशीचे आदेश

जिल्हाधिकार्‍यांना शपथपत्र दाखल करण्याचे निर्देश

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीत झालेल्या खर्चावर शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख गिरीश जाधव यांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने या खर्चाची स्वतंत्र समिती नियुक्त करुन चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. या प्रकरणी दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले असल्याची माहिती याचिकाकर्ते गिरीश जाधव यांनी दिली.

- Advertisement -

माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रशासनाकडे दाखल असलेल्या बिलांबाबत गिरीश जाधव यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मनपा व लोकसभा दोन्ही निवडणुका जिल्हाधिकारी यांच्याच नियंत्रणाखाली पार पडल्या. त्यामुळे दोन्ही ठिकाणी झालेल्या खर्चाची व दराची माहिती त्यांना असायला हवी होती.

मात्र, दोन्ही ठिकाणच्या दरातील तफावत आणि महापालिकेने काही वस्तूंवर केलेला अवाजवी खर्च पाहता, सर्व सहमतीने व संगनमताने केलेला हा गैरव्यवहारच असल्याचे बिलांमधून स्पष्ट होते, असा दावा जाधव यांनी केला आहे.

महापालिका अधिकार्‍यांनी निवडणूक खर्चाच्या नावाखाली व या खर्चाचे ऑडीट होत नसल्याचा फायदा घेऊन नगकरांच्या लाखो रुपयांवर थेट डल्ला मारला असल्याचा आरोप याचिकेत केला आहे. ज्या वस्तूवर खर्च करतोय, त्याची खरेदी किंमत आणि भाड्याचे दर याचा कुठलाही विचार झालेला नाही. यातून महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

यावर सुनावणी होऊन न्यायालयाने अवाजवी खर्चाची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचा अहवाल न्यायालयात सादर करावा व जिल्हाधिकारी यांनी दोन आठवड्यात शपथपत्र दाखल करावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. जाधव यांच्या वतीने अ‍ॅड. विजय लटंगे यांनी काम पाहिले.

दरम्यान, पुण्यात झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या घोटाळ्यात आणि या घोटाळ्यात साम्य आहे. तो मोठ्या रकमेचा घोटाळा होता. मात्र, हा घोटाळाही असाच आहे. यात बिलांची तपासणी करणारे तत्कालीन शहर अभियंता विलास सोनटक्के हेही जबाबदार आहेत. त्यांचीही या प्रकरणात चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या