महापालिकेत उपायुक्तांकडील कार्यभार वार्‍यावर

jalgaon-digital
3 Min Read

पंधरा दिवसानंतरही पर्यायी व्यवस्था नाही : कर, घनकचरा, आरोग्याची कामे रखडली

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेचे उपायुक्त सुनील पवार यांची बदली होऊन पंधरा दिवस उलटले तरीही अद्याप त्यांच्याकडील कार्यभार अन्य कोणत्याही अधिकार्‍याकडे सोपविण्यात आलेला नाही. कर, आरोग्य, घनकचरा, शिक्षण मंडळ असे महत्त्वाचे विभाग त्यांच्याकडे होते. या विभागाच्या फाईल पेंडिंग राहिल्याने कामे खोळंबली आहेत.

साधारण वर्षभरापूर्वी पवार यांची सांगलीहून नगरला उपायुक्तपदावर बदली झाली होती. त्यापूर्वी अनेक महिने हे पद रिक्त असल्याने विविध विभागाची कामे रेंगाळली होती. पवार नगरला आल्यानंतर महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकांमुळे कामाला गती देता आली नाही. मात्र त्यानंतर त्यांनी कामाला गती देत प्रलंबित कामे मार्गी लावली. एवढेच नव्हे, तर स्वच्छ भारत अंतर्गत झालेल्या विविध सर्वेक्षणाची तयारीही त्यांनी केली. कचरा संकलनासाठी त्यांनी शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. करोना उद्भवल्यावर लोकांना जीवनावश्यक वस्तू, हातावर काम असल्याने उपासमार होत असलेल्यांना व परप्रांतियांना जेवण ही कामे महापालिकेने हाती घेतले. यावरील देखरेखीची जबाबदारीही पवार यांच्याकडे होती.

पंधरा दिवसांपूर्वी पवार यांची कल्याण डोंबिवली महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदावर बदली झाली. तातडीने तेथे हजर होण्याचे आदेश असल्याने बदलीचा आदेश प्राप्त होताच, ते कल्याण डोंबिवलीला हजर झाले. एखाद्या उपायुक्ताची बदली झाल्यानंतर महापालिकेतील दुसर्‍या उपायुक्तांकडे किंवा समकक्ष अधिकार्‍याकडे तो पदभार दिला जातो.

पवार यांच्याकडे कर, आरोग्य, घनकचरा, शिक्षण मंडळ आदी विभाग आहेत. पंधरा दिवसांपासून त्यांच्याकडील जबाबदारी अन्य कोणावर सोपविण्यात आली नसल्याने वरील सर्व महत्त्वाच्या विभागांची कामे ठप्प आहेत. एखादे महत्त्वाचे काम असेल, तर ती फाईल थेट आयुक्तांपर्यंत जाते. उपायुक्त नसल्याने आणि त्यांचा पदभार कोणालाही सोपविण्यात आलेला नसल्याने त्या फाईलवर आयुक्त मंजुरीची स्वाक्षरी करून ते काम भागवले जाते. मात्र इतर सर्व फाईल अधिकारीच नसल्याने प्रलंबित आहेत.

शिक्षण मंडळाचे पगार प्रलंबित
उपायुक्त (कर) यांच्याकडे शिक्षण मंडळाचाही कार्यभार आहे. या पदावरील सुनील पवार यांची बदली झाल्यानंतर त्यांचा पदभार कोणाकडेच देण्यात आलेला नाही. शिक्षण मंडळास महापालिकेक़डून अनुदान दिले जाते. त्याचे पैसे शिल्लक आहेत. त्यातूनच शिक्षण मंडळातील कर्मचार्‍यांचे पगार केले जातात. मात्र उपायुक्तपदाचा कार्यभार कोणाकडे नसल्याने त्या संदर्भातील कागदपत्रांवर सह्याच झाल्या नसल्याने येथील कर्मचार्‍यांचे पगारही रखडले असल्याचे सांगण्यात आले.

ठराविक अधिकार्‍यांचा कोंडाळा
महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी नगरमध्ये पदभार घेतला आणि करोनाचा कहर सुरू झाला. या काळात त्यांच्या संपर्कात महापालिकेतील ठराविक अधिकारी सातत्याने आले. त्यांच्याच कोंडाळ्यात ते अडकले असल्याची चर्चा महापालिकेच्या अधिकार्‍यांमध्ये आहे. या ठराविक अधिकार्‍यांच्या सल्ल्यानेच कारभार सुरू असल्याचीही चर्चा आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *