हॉस्पिटलच्या सिक्युरिटी गार्डला महापालिकेत मारहाण

हॉस्पिटलच्या सिक्युरिटी गार्डला महापालिकेत मारहाण

पोलिसांत गुन्हा दाखल । भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेंची दबंगगिरी

अहमदनगर (प्रतिनिधी) – साईदीप हॉस्पिटलच्या सिक्युरिटी गार्डला पंटरांमार्फत उचलून आणून भाजप नगरसेवक तथा सभागृह नेता स्वप्नील शिंदेंसह दोघांनी मारहाण केली. या मारहाणीसाठी महापालिकेची केबिन वापरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नगरसेवक शिंदेंसह तीनजणांविरोधात अपहरण व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय परशुराम छत्तिसे (वय 42) असे मारहाण झालेल्या सिक्युरिटी गार्डचे नाव आहे. तो साईदीप हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. या प्रकरणी स्वप्नील शिंदे, भैय्या संपत गोरे यांच्यासह तीन अज्ञातांविरुद्ध पळवून नेणे, मारहाण करणे, जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महापालिकेत सभागृह नेते असलेले भाजपचे नगरसेवक शिंदे यांच्या महापालिकेतील दालनामध्ये ही मारहाण झाली. फिर्यादी हा मूळचा नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावचा रहिवासी आहे. तो नगरमधील एका हॉस्पिटलमध्ये सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस आहे.

रुग्णालयाच्या सहाव्या मजल्यावर ड्युटी करत असताना तीन अज्ञातांनी बळजबरीने गाडीत बसवून त्याला नगर महानगरपालिकेच्या पहिल्या मजल्यावर शिंदे यांच्या दालनामध्ये नेले. तिथे शिंदे व इतरांनी छत्तिसे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. भैय्या संपत गोरे याची पाईपलाईन शेतातून जाऊ दे. त्यास विरोध करू नको, नाहीतर तुझे हातपाय काढून घरी बसवू, अशी धमकीही दिली. कार्यालयातील अन्य लोकांनाही छत्तिसे याला मारण्यासाठी चिथावणी दिली. मारहाणीनंतर छत्तिसे यांना स्कॉर्पिओ गाडीत बसवून रुग्णालयात सोडण्यात आले.

मागील आठवड्यात हा मारहाणीचा प्रकार घडला. छत्तीसे यांनी थेट पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्याकडे तक्रार अर्ज दिला. त्यांनी तोफखाना पोलीस ठाण्याला चौकशीच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी रुग्णालय व महानगरपालिकेतील सीसीटीव्ही कमेर्‍यांचे फूटेज तपासले. त्यात शिंदे यांच्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून छत्तीसे यांना नेतानाची दृश्ये आहेत. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सोनवणे करत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com