…अन् आयुक्तांची चूक झाली दुरूस्त

jalgaon-digital
2 Min Read

मंगल कार्यालयासदंर्भात चुकीने निघाला आदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात धंदे पुरते बसले. त्यातून कसेबसे सावरत असताना महापालिका आयुक्तांनी मंगल कार्यालय बंद करण्याचे आदेश काढले. मात्र हे आदेश चुकीने निघाल्याचे सांगत लगेचच ते दुरूस्तही करण्यात आले. मात्र या चुकीच्या आदेशाने मंगल कार्यालयावाले पुरते भांबावले.

निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी 2 जून रोजी आदेश काढत मंगल कार्यालयात अटी शर्तीवर लग्न समारंभ करण्यास परवानगी दिली. काल 11 जून रोजी महापालिका आयुक्तांच्या आदेशाने त्यावर पाणी फेरले गेले. शाळा, कॉलेज, क्लासेस, जीम, जॉगिंग पार्क, थियटरच्या रांगेत मंगल कार्यालयाचे नाव घेत या सगळ्या अस्थापना चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यासाठी 16 महापालिका कर्मचार्‍यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. त्यावर देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षकही नियुक्त केले. सामान्य प्रशासन विभागाने 216 जावक नंबरने ही आर्डर काढली. ही ऑर्डर मिळताच मंगल कार्यालयावाले भांबावले. पुढच्या तारखा बुकिंग घेतल्याने काय करावे असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला.

ही बाब ‘नगर टाइम्स’ने महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर त्यांनी त्या आदेशात चुकून मंगल कार्यालयाचे नाव टाईप झाले असे सांगत तातडीने ती चुकीची दुरूस्ती केली. त्यामुळे मंगल कार्यालयावाल्यांसमोर निर्माण झालेली अडचण दूर झाली. आदेश टाईप करण्याऐवजी कॉपी-पेस्टच्या खेळात हा चुकीचा आदेश निघाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

हा आहे नवा आदेश
एकाच ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळळे, विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई करणे आणि व्यवसायाच्या ठिकाणी सॅनिटाइझर वापर बंधनकारक करणे यासाठी पथक नियुक्तीचे आदेश आज शुक्रवारी तातडीने 222 जावक क्रमांकाने निघाले. त्यासाठी व्हिजीलन्स स्कॉड व पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत.

काळजी घ्या…
मंगल कार्यालय संचालक संघटनेचे अध्यक्ष तथा माजी महापौर भगवान फुलसौंदर यांनीही याबाबत आयुक्तांशी चर्चा केली. अशा चुकीच्या आदेशाने गोंधळ उडतो. त्यामुळे प्रशासनाने काळजीपूर्वक आदेश काढावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मंगल कार्यालयात लग्न समारंभ सुरूच राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *