Thursday, April 25, 2024
Homeनगरअवघ्या वर्षाच्या आतच तीन पठ्ठे ‘नगररचना’त परतले

अवघ्या वर्षाच्या आतच तीन पठ्ठे ‘नगररचना’त परतले

हंगामी बदली करून घेण्यात आले यश : प्रशासनाच्या निर्णयाबाबत अनेक प्रश्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- अवघ्या वर्षाच्या आतच महापालिकेच्या नगररचना विभागातून बदली झालेले कर्मचारी पुन्हा नगररचना विभागात येण्यात यशस्वी झाले आहेत. आयुक्तांच्या मान्यतेने या तीन कर्मचार्‍यांच्या बदल्या हंगामी स्वरूपात करण्यात आल्या असल्या तरी त्यांचा हा नगररचनातील पुनर्प्रवेश अनेकांसाठी आश्चर्यकारक मानला जात आहे.

- Advertisement -

महापालिकेत सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे नगररचना विभाग असतो. अनेक प्रकरणात बरेच उद्योग होत असल्याने या विभागाकडे सातत्याने संशयाने पाहिले जाते. पावसाळ्यात हा विभाग जास्त वादग्रस्त ठरतो. शहरातील नाल्यांमध्येही बांधकाम, पाईप टाकण्यास परवानगी देणे, अशी कामे होत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करणे, ठराविक बांधकाम व्यावसायिकांच्या प्रकरणांना मंजुरी देणे असे प्रकार चालत असल्याने हा विभाग कायम चर्चेत असतो. नाल्यांमधील बांधकामांमुळे पावसाचे पाणी वसाहतीत शिरत असल्याने पावसाळ्यात या विभागाला शिव्याशाप घ्यावे लागतात.

वर्षानुवर्षे तेच कर्मचारी या विभागात काम करत असल्याने कोणाला कसे ‘हाताळायचे’ याचे गमक त्यांना आलेले होते. कोणत्या प्रकरणात काय केले म्हणजे आपले ‘इप्सित’ साधले जाईल, याची त्यांना हातोटी आलेली होती. अनेक वर्षांपासून या विभागात असलेल्या कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात याव्यात, अशी सातत्याने मागणी होत असे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही यावर चर्चा झडत असे.

मात्र तरीही प्रशासन येथील कर्मचार्‍यांना हात लावायचे धाडस करत नव्हते. तत्कालीन आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी याबाबत धाडस दाखवले. येथील बहुतांश जुन्या कर्मचार्‍यांच्या त्यांनी इतर विभागात बदल्या केल्या. या बदल्या होऊ नयेत, यासाठी काही पदाधिकारी, नगरसेवक एवढेच नव्हे, तर महापालिकेच्या काही अधिकार्‍यांनीही प्रयत्न केले. मात्र भालसिंग यांनी कोणतीही पर्वा न करता बदल्या करण्याच्या निर्णयावर ठाम रहात त्याची अंमलबजावणी केली.

बदलीनंतरही या कर्मचार्‍यांना पुन्हा घेण्यात यावे, यासाठी वारंवार प्रयत्न झाले. एका मोठ्या पदाधिकार्‍याने यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. मात्र भालसिंग यांनी त्याला भीक घातली नाही. भालसिंग निवृत्त झाल्यानंतर काही महिने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार आला. ते असताना कोणीही प्रयत्न केले नाहीत. मात्र श्रीकांत मायकलवार यांच्या रूपाने पुर्णवेळ आयुक्त मिळाल्यानंतर यासाठीच्या हालचालींनी पुन्हा जोर धरला होता. सर्वच्या सर्व कर्मचारी पुन्हा नगररचना विभागात आणता येत नसले, तरी मर्जीतील कर्मचार्‍यांना आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यात आता यश आले आहे.

नगररचना विभागातून बदली झालेले सतीश दारकुंडे, जितेंद्र सासवडकर आणि संजय चव्हाण यांची या विभागात बदली करण्यात आली आहे. राजाराम मोरे, नितीन गोरे आणि कृष्णा साळवे यांच्या जागेवर ही बदली करण्यात आली आहे. बदली आदेशात ‘हंगामी बदली’ असे संबोधण्यात आले आहे. 2 जुलैपर्यंतच ही बदली असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी काही काळासाठी काम पहायचे असल्यास तात्पुरता चार्ज त्यांना दिला जात असे. बदलीचा आदेश काढण्यामागे कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या विभागातील प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी ही बदली केली असून, बदलीच्या काळात ती पूर्ण करावीत, असे आदेशात म्हटले आहे.

कामे पूर्ण झाली नाही तर…
तिघांना बदली आदेश देताना 2 जुलैपर्यंत प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे सांगितले आहे. मात्र या मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर पुढे काय, याचा काहीही उल्लेख नाही. तसेच झाल्यास बदलीला पुन्हा मुदतवाढ देणार का? अशी मुदतवाढ किती काळ देणार? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बदलीसाठी सातत्याने प्रयत्न करणार्‍यांचीच बदली कशी झाली, हे देखील संभ्रमात टाकणारे आहे. विषेश म्हणजे त्यातील एक कर्मचारी नगरसेवकाचा नातेवाईक असल्याने संशयाला पुष्टी मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या