महाविकास कागदावरच !
Featured

महाविकास कागदावरच !

Sarvmat Digital

पोटनिवडणूक । सेना-राष्ट्रवादी मनोमिलनाचे प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी) – दहा वर्षे ज्या शिवसेनेशी नगरात राजकीय पंगा घेतला त्याच शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर राज्यातील ‘महाविकास’च्या प्रयोगाने आली आहे. पोटनिवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचे मनोमिलनाचे प्रयत्न सुरू झाले आहे. आजतरी नगरात महाविकास आघाडीचा प्रयोग हा कागदोपत्रीच असल्याचे दिसते आहे.

सावेडीतील सहा नंबर वार्डातील राखीव जागेसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. शिवसेनेच्या अनिता दळवी आणि भाजपच्या पल्लवी जाधव यांच्यात सरळ लढत होत आहे. राष्ट्रवादीने पोटनिवडणुकीसाठी उमेदवार दिलेला नाही. राज्यातील राजकीय परिस्थिती वेगळी अन् नगरातील वेगळी असे चित्र नेहमीच नगरकरांनी अनुभवले आहे. महापालिकेच्या सत्तेपासून शिवसेनेला बाजुला ठेवण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपची साथसंगत केल्याचे नगरकरांच्या अजून स्मरणात आहे. महापालिकेतील या राजकीय घडामोडीचे पडसाद राज्यभर उमटले. त्यानंतर राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. राज्यातील सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यापुढे आता महाविकास आघाडी करण्याच्या सूचना तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी स्थानिक नेत्यांना दिल्या आहेत. त्यानंतर नगरमध्ये पहिलीच निवडणूक होत आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळीच महाविकास आघाडीची मोट बांधली गेली, पण नगर शहरात अशी मोट बांधण्याचा प्रयत्न पोटनिवडणुकीच्या निमित्ताने सुरू झाला आहे. नगर शहरावर गत 25 वर्षे शिवसेनेचा भगवा फडकत होता. त्याच भगव्याशी राष्ट्रवादीने नगरात राजकीय पंगा घेत घड्याळाची बॅटरी चार्ज केली. परिणामी दोनदा आमदारकी जिंकत राष्ट्रवादीचा पाया भक्कम झाला. आता राज्यातील महाविकासच्या प्रयोगाने नगरात त्याच राष्ट्रवादीला शिवसेनेसोबत जुळवून घेण्याची नामुष्की आली आहे.
शिवसेनेचा उमेदवार असल्याने शिवसेनेने प्रचारपत्रकही छापली आहेत. त्यावर महाविकास आघाडीचा उमेदवार असा उल्लेख आहे. प्रचाराच्या कागदोपत्री महाविकास आघाडी दिसत असली तरी प्रत्यक्षात ती अजूनतरी उतरलेली दिसत नाही. आता ही जबाबदारी शिवसेनेच्या मुंबईस्थित नेत्यांना पार पाडावी लागणार आहे.

आ. जगताप, राठोडांचे फोटो गायब
शिवसेनेच्या छापलेल्या प्रचारपत्रकावरून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आ. संग्राम जगताप, शहरप्रमुख माणिक विधाते, शिवसेनेचे स्थानिक नेते माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, काँग्रेसचे प्रभारी शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांचे फोटोच गायब झाले आहेत. त्याऐवजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांचे फोटो टाकून महाविकास आघाडी असल्याचा संदेश नगरकरांमध्ये देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्याअर्थी स्थानिक नेत्यांच्या मनोमिलनात कुठेतरी कमतरता असल्याची चर्चा नगरात आहे.

संपर्कप्रमुख कोरगावकर घेणार पुढाकार
शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर हे महाविकास आघाडीतील घटकपक्षाच्या स्थानिक नेत्यांशी बोलून मनोमिलन करणार असल्याचे समजते. राष्ट्रवादीचे नेते आ. जगताप, काँग्रेसचे दीप चव्हाण यांच्याशी कोरगावकर हे चर्चा करणार असून त्यांचा प्रचारात सक्रिय करतील अशी माहिती सेेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी दिली.

उद्या महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. त्याला महाविकास आघाडीतील घटकपक्ष एकत्रित आलेली दिसतील. जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवेळीच महापालिका पोटनिवडणुकीची चर्चा राष्ट्रवादीचे निरीक्षक अंकुश काकडे यांच्यासोबत झालेली आहे. त्यानुसार राष्ट्रवादीने उमेदवार दिलेला नाही. महाविकास आघाडी फायनल झाली आहे.
– दिलीप सातपुते, शहरप्रमुख शिवसेना.

Deshdoot
www.deshdoot.com