नगर : डॉ. बोरगे यांना निलंबित करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी
Featured

नगर : डॉ. बोरगे यांना निलंबित करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी

Sarvmat Digital

रक्तपेढीच्या दुरवस्थेला धरले जबाबदार : नवीन यंत्रसामग्री धूळखात पडून

अहमदनगर (प्रतिनिधी) –  सर्वसामान्य नागरिकांना, रुग्णांना अत्यल्प दरात रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने पालिकेने सुरू केलेल्या रक्तपेढीची सध्याची अवस्था दयनीय असून, याचे प्रमुख असलेले वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना निलंबित करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली.

महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालय येथे असलेल्या रक्तपेढीची दुरवस्था झाली आहे. तेथे रक्ताचा एकही थेंंब उपलब्ध नसल्याचे समजल्यावर भाजपच्या कार्यकर्त्यांनी रक्तपेढीला अचानक भेट दिली. त्यावेळी तेथे केवळ दोनच कंत्राटी कर्मचारी होते. एकही जबाबदार अधिकारी किंवा कर्मचारी रक्तपेढीत नव्हते. रक्तपेढीचे प्रमुख डॉ. शंकर शेडाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी आजारी असल्याने केवळ सही करुन घरी आलो असल्याचे सांगत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. शेडाळे यांना धारेवर धरले.

रक्तपेढीचे उदघाटन 1986 साली भाजपचे नेते माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते झाले. त्यामुळे या रक्तपेढीप्रती सर्व भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मनात आपुलकी असल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. सर्वसामान्य रुग्णांना आधार असलेल्या या रक्तपेढीची अवस्था विचित्र झाली आहे. डॉ. शंकर शेडाळे हे केवळ रजिस्टरवर सह्या करण्यापुरतेच रक्तपेढीप्रमुख राहिले आहेत.

डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे, कर्मचार्‍यांअभावी, येथे लाखो रुपयांच्या नव्या मशिनरी धूळखात पडल्या आहेत. एखादा रक्त देण्यासाठी आल्यास त्याचे रक्त घेण्यासाठीही साहित्य नाही. तंत्रज्ञ व इतर कर्मचारीही नाहीत. अशा असुविधा असल्याने ही रक्तपेढी केवळ नावापुरतीच राहिली आहे. शहरातील खासगी रक्तपेढ्यांमध्ये 1500 ते 2000 रुपयांपर्यंत रुग्णांना रक्त मिळते, मात्र मनपाच्या या रक्तपेढीमधून केवळ 500 रुपयांत सर्वसामान्य रुग्णांना रक्त मिळत असे.

आज मात्र या रक्तपेढीत रक्ताची एकही पिशवी नसणे संतापजनक आहे. येथे असलेली केवळ एक सिस्टर व कर्मचारी यांनी मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांच्याकडे वारंवार पत्र व्यवहार करुन रक्तपेढीसाठी कर्मचारी व साहित्यांची मागणी केली; मात्र डॉ. बोरगे यांनी याकडे दुर्लक्ष केले. सर्वसामान्य नागरिकांना आधार असलेल्या या रक्तपेढीच्या दुरावस्थेसाठी डॉ. बोरगे हेच जबाबदार असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. तसेच महापौर बाबासाहेब वाकळे यांची लवकरच भेट घेऊन रक्तपेढी पुन्हा सुरु करण्यासाठी उपाययोजना राबविण्याबरोबरच आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

यावेळी भाजपाचे अनिल गट्टाणी, वसंत लोढा, महावीर कांकरिया, केडगांव मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, हरिभाऊ डोळसे, महेश नामदे, तुषार पोटे, सुहास पाथरकर, विकी सुपेकर आदी उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com