रुग्णवाहिकांचा गैरवापर, कोरोनाच्या प्रसाराची शक्यता

jalgaon-digital
2 Min Read

संगमनेरच्या रुग्णवाहिकांमधून होतेय अनेकांची मुंबई वारी

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – शहरातील अनेक रुग्णवाहिका आता प्रवाशी वाहतूक करीत असून या रुग्णवाहिकांंचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर सुरू असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. जवळपास सर्वच प्रवाशी वाहने बंद झाल्याने याचा गैरफायदा रुग्णवाहिका मालकांनी घेतला आहे. शहरातील अनेक जण अशा रुग्णवाहिकेतून प्रवास करताना दिसत आहे. काही मुंबईवारीही केली असल्याने मुंबईतील कोरोनाचा संगमनेरात प्रसार होण्याची भीती वर्तवली जात आहे.

अत्यावस्थेतील रुग्णांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्याचे काम रुग्णवाहिकांंचे असते रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका ही संकल्पना सुरू करण्यात आली आहे. सध्याच्या काळात अनेक रुग्णालयांनी स्वतःच्याच रुग्णवाहिका घेतल्या. काही काही ठिकाणी सामाजिक संघटना रुग्णवाहिकेची सेवा पुरवत असून काहींनी वैयक्तिक पातळीवर रुग्णवाहिका घेतल्या आहे. रुग्णांना तातडीची गरज म्हणून या रुग्णवाहिका काम करतात. संगमनेरात काही दिवसांपासून मात्र वेगळेच चित्र दिसत आहे.

रुग्णवाहिका यांना पोलीस सहजा अडवत नाही हे लक्षात आल्यानंतर काही नागरिकांनी रुग्णवाहिकेच्या सेवेचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली खाजगी कामासाठी रुग्णवाहिकांंचा सर्रास वापर सुरू झाला आला. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे वातावरण आहे कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत चालल्याने सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या. लॉकडावून सह विविध उपाययोजना राबविण्यात येत असल्याने याचा प्रभाव वाहतुकीवरही झाला. सर्व खाजगी वाहने एस. टी.च्या बसेस, व इतर वाहने बंद करण्यात आली. यामुळे बाहेरगावी प्रवास करणे अशक्य झाले.

नेमका या संधीचा गैरफायदा काही रुग्णवाहिका मालकांनी घेतला आहे. त्यांनी रुग्ण वाहण्याऐवजी प्रवाशी वाहतूक सेवा सुरु केली आहे. संगमनेरातील काही रुग्णवाहिका कोपरगाव, नगर, मुंबई व नाशिक या ठिकाणी चक्क प्रवाशी वाहतूक करीत आहे. ठराविक पैसे दिल्यानंतर रुग्णवाहिकामधून सहज प्रवास करता येतो हे लक्षात येताच काही जणांनी रुग्णवाहिकांची ही सेवा पसंद केली.

गेल्या महिन्यात अनेकांच्या मुंबई वार्‍या अशा रुग्णवाहिकामधूनच झाल्याचे समजते. मुंबईत कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असताना संगमनेरचे काही युवक मुंबईला ये-जा करत आहेत. यातून मुंबईचा कोरोना संगमनेरात येवू शकतो, अशी भीती वर्तवण्यात येत आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *