Friday, April 26, 2024
Homeनगर9 दारू दुकानांचे परवाने निलंबित

9 दारू दुकानांचे परवाने निलंबित

लॉकडाऊन काळातील दारू विक्री भोवली : मद्य साठ्यात तफावत

अहमदनगर (प्रतिनिधी)- करोना लॉकडाऊनच्या काळात दारू विक्री बंद असताना जिल्ह्यातील 9 दारू दुकानांमध्ये अवैध दारूची विक्री झाल्याचे समोर आले आहे. यामुळे या दारू विक्री दुकान आणि हॉटेलचे परवाने निलंबित करण्यासोबत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद आहेत. या काळात काही मद्य विक्री दुकानांतून अवैध पद्धतीने दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आल्या होत्या. यावर, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी पंचांसमक्ष या दारू दुकाने उघडून मद्यसाठा तपासला असता त्यात मोठी तफावत आढळून आल्याने गुन्हा नोंदविण्यात आला. तसेच त्याचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सादर केला.

साथ रोग अधिनियमाचे उल्लंघन केल्याबद्दल जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी ही 9 दारू विक्री दुकाने तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये सात परमिट रूम, एक बिअर शॉपी व एक देशी मद्य किरकोळ विक्रेता यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन संपल्यानंतर त्यांच्या दुकानाचा परवाना कायमस्वरूपी रद्द का करण्यात येऊ नये?याबाबतचा खुलासा पुढील सात दिवसांच्या आत या कार्यालयास सादर करण्यात यावा, असे त्यांना बजावण्यात आले आहे.

शासनाच्या अटी व नियमांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली असून यापुढे नियम मोडणार्‍यावर कडक इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांनी दिला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनच्या कालावधीत अ विभाग, ब विभाग, श्रीरामपूर विभाग, कोपरगाव विभाग, संगमनेर विभाग, असे एकूण 5 विभाग व भरारी पथक क्रमांक 1 व 2 अशी 2 भरारी पथके कारवाई करत आहेत. तसेच यापुढेही अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

निलंबित करण्यात आलेल्यांमध्ये हॉटेल गोविंदा गार्डन (निमगाव जाळी, ता. संगमनेर), हॉटेल नेचर ( वडगावपान, ता. संगमनेर), हॉटेल गोल्डन चॅरियट (बेलापूर, ता. श्रीरामपूर), हॉटेल धनलक्ष्मी (देवळाली प्रवरा), हॉटेल उत्कर्ष (सोनगाव सात्रळ, ता. राहुरी), हॉटेल ईश्वर (वडझिरे, ता. पारनेर), हॉटेल मंथन ( निघोज, ता. पारनेर), देशी दारू किरकोळ विक्री सीएल-3 अनुज्ञप्ती, संगमनेर आणि आनंद बिअर शॉपी (निमगाव कोर्‍हाळे, ता. राहाता) यांचा समावेश आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत 24 मार्च ते 28एप्रिलपर्यंत उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य निर्मिती, वाहतूक व विक्री धंद्यावर धडक कारवाई करून 154 गुन्हे नोंद करून 52 लाख 4 हजार 514 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 59 आरोपींना अटक करण्यात आलेली असून 11 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या