अकोलेतील राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकार्‍यांच्या आज निवडी
Featured

अकोलेतील राष्ट्रवादीच्या तालुका पदाधिकार्‍यांच्या आज निवडी

Sarvmat Digital

निरीक्षक म्हणून कार्याध्यक्ष वर्पे, युवकचे जिल्हाध्यक्ष पवार यांच्यावर जबाबदारी

अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठेनेते मुधकर पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर पोरकी झालेल्या अकोले तालुक्यातील पक्ष संघटना बांधणीला आज (सोमवारचा) मुहूर्त लाभला आहे. तालुका अध्यक्ष, महिला पदाधिकारी, युवक तालुकाध्यक्ष यासह जिल्हा कार्यकारिणीवर कोणाला पाठवायचे हे निश्चित करण्यासाठी पक्षाने जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपील पवार यांना अकोलेला पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार हे दोघे आज राजूरला पोहचणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अकोलेत पिचड पिता-पुत्रांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजप प्रवेश केला. त्यावेळी तालुक्यातील पक्ष संघटनेतील प्रमुखांनी पिचड यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रिक्त झालेल्या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांची पदे अद्याप भरलेली नाहीत. तालुक्यात पक्षात असलेली गटबाजी, स्थानिक मुद्दे, भष्ट्राचाराचे आरोप यामुळे पक्षाच्या तालुका पदाधिकारी निवडी रखडल्या होत्या. त्यात आता सर्वच पदासाठी इच्छुक वाढल्याने पक्षातील जबाबदार पदाधिकार्‍यांनी अकोलेतील निवडीपासून स्वत: लांब ठेवले असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे राज्यात युवक संघटनाचे सर्वात अव्वल काम करणार्‍या युवकचे जिल्हाध्यक्ष कपील पवार देखील शेजारी असणार्‍या अकोले तालुक्यातील संघटनात्मक पदाधिकारी निवडीपासून लांब राहिल्याने आर्श्चय व्यक्त होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अशोक भांगरे आणि विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे राष्ट्रवादीत आले. मात्र, निवडणुकीतनंतर या दोन्ही गटात धूसफूस सुरू झाल्याने संघटनात्मक पदाधिकारी निवडी लांबल्या. तालुक्यातील संघटनात्मक जबाबदार्‍या आपआपल्या कार्यकर्त्याला मिळावी, यासाठी त्यांच्यात स्पर्धा आहे.

यामुळे तालुकाध्यक्ष पदासह अन्य निवडी मुलाखतीनंतर लगेच जाहीर करा, असा आग्रह एका गटाकडून करण्यात येत आहेत. तर काही ‘दादा’ आणि ’ताई’कडे पदासाठी फिल्डींग लावली आहे. यामुळे मुलाखती घेण्यास जाणार्‍या निरिक्षकांवर याचा दबाव राहणार आहे. आज दुपारी राजूर येथे होणार्‍या बैठकीकडे अकोलेसह जिल्ह्याचे लक्ष लागून असून निरिक्षक त्याच ठिकाणी निवडी जाहीर करणार की अकोलेचा विषय पक्षश्रेष्ठींच्या कोर्टात जाणार हे आज समोर येणार आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपचे काम करणारे काही कार्यकर्ते आता राष्ट्रवादी सत्तेत आल्याने त्यांनी पिचड यांना सोडून राष्ट्रवादीसोबत येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आधी पदासाठी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये धूसफूस असल्याने त्या माजी पिचड समर्थकांना संधी देवू नका, असे निष्ठावानांकडून आग्रह धरण्यात येत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com