अकोले – तालुक्यात निसर्ग वादळाने घेतला एकाचा बळी
Featured

अकोले – तालुक्यात निसर्ग वादळाने घेतला एकाचा बळी

Sarvmat Digital

अकोले (प्रतिनिधी) – तालुक्यातील लहीत बुद्रुक येथे निसर्ग वादळाने घराच्या पडवीची भिंत पडून एकाचा मृत्यू झाल्याची दुदैवी घटना काल रात्री घडली. तर तालुक्यात ४ ते ५ जणावरं दगावुन ६० ते ६१ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.पंचनामे करण्याचे काम शासकीय पातळीवर वेगाने सुरू आहेत

याबाबत अधिक माहिती अशी कि ,काल निसर्ग वादळाने राज्यात कहर सुरु असताना या वादळाचा अकोले तालुक्यालाही फटका बसला आहे.काल या वादळाने तालुक्यातील लहीत बुद्रुक येथील सागर पांडुरंग चाैधरी ( वय ३२ वर्षे) या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये माथाडी कामगार म्हणून काम करणाऱ्या युवकाचा घराच्या पडवीची भिंत अंगावर पडून आज सकाळी मृत्यू झाला आहे .तर तालुक्यात या वादळाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.प्राथमिक माहितीनुसार ४ ते ५ जणावराचा मृत्यू झाला आहे तर तालुक्यातील ग्रामीण भागात ६० ते ६१ घराची पडझड झालेली आहे.

जोरदार वादळी वाऱ्याने अकोले – संगमनेर रस्त्यावर सुगाव बुद्रुक फाट्यावर व कळस येथे रस्त्यावरच बाभळीचे झाड पडल्यामुळे अकोले व संगमनेर रस्ता रात्री बंद झाला होता, सकाळी रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून रस्ता वाहतूकीस खुला झाला. अकोले शहरातील मॉडर्न हायस्कूल जवळ लिंबाचे मोठे झाड अर्बन च्या विजांच्या तारांवर पडल्याने तारा रस्त्यावर तुटून पडल्या. वीज मित्र श्रीराम वाकचौरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सकाळ पासून युध्द पातळीवर वीजेच्या तारा दुरुस्ती चे काम सुरू केल्याचे दिसले.दुपार पर्यंत या परिसरात विद्युत पुरवठा पूर्ववत होईल अशी आशा श्री वाकचौरे यांनी व्यक्त केली.तर कुंभारवाडा येथे असलेली जुनी झाडे काढून टाकावीत अन्यथा दुदैवी घटना घडू शकते असे स्थानिक ग्रामस्थ भालेराव यांनी सांगितले. दरम्यान शहरातील अनेक ठिकाणी बंगल्याच्या कडेला असणारी झाडे वादळी वाऱ्याने उन्मळून पडली आहे.

देवठाण (वार्ताहर) – येथे बुधवारी झालेल्या वादळाने व मुसळधार पावसामुळे घरांचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कामगार तलाठी बाळकृष्ण सावळे हे स्वतः नुकसान स्थळी जाऊन पाहणी करून पंचनामे करीत आहेत. वादळामुळे घरांचे पत्रे उडाले, भिंती पडल्या, काही ठिकाणी मोठी झाडे पडली विजेचे लोखंडी खांब वाकले आहेत तसेच मका, ऊस , कोथंबीर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. स्थानिक कृषि सहायक आणि ग्रामसेवक नसल्यामुळे तलाठी श्री. सावळे याना पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर यांची मदत घ्यावी लागली.

Deshdoot
www.deshdoot.com