Thursday, April 25, 2024
Homeनगरजिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार सिंह यांनी स्वीकारला

जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा पदभार सिंह यांनी स्वीकारला

अहमदनगर (प्रतिनिधी) – जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून अखिलेश कुमार सिंह यांनी गुरुवारी दुपारी पदभार स्वीकारला आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याकडून त्यांनी सूत्रे हाती घेतली. यावेळी शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार उपस्थित होते.

नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षकपद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त होते. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांच्याकडे प्रभारी पदभार होता. तत्कालीन पोलिस अधीक्षक ईशू सिंधू उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. सिंधू यांच्या जागी कोण येणार यांची गेल्या चार महिन्यांपासून चर्चा सुरू होती.

- Advertisement -

मुंबई शहर परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांची नियुक्ती झाल्याने त्यांनी आज सूत्रे हाती घेतली. त्यांनी अकोला येथे प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यानंतर यवतमाळ, बीड, धुळे येथे पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे.

कोरोनामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान सिंह यांच्यासमोर असणार आहे. तसेच, वाळू तस्करी, कमी मनुष्यबळामध्ये जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आणि नवीन पोलिस ठाणे मंजूर करून आणणे, खून, दरोडा, चोर्‍या, अपहरण अशा गुन्हात चार महिन्यांपासून वाढ होत आहे. डॉ. सागर पाटील यांना अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यात यश आले असले तरी वाढती गुन्हेगार धोकादायक आहे. क्षेत्रफळाने मोठा व गुन्हेगारीत पुढे असलेल्या जिल्ह्यात वाळू तस्करी, अवैध धंदे यामुळे अनेक प्रश्न उभे आहेत.

लोकांनी लॉकडाउन नियमांचे पालन करावे. अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये. एका व्यक्तीकडून दुसर्‍याकडे कोरोना संसर्ग होतो. कोरोना बाधित व्यक्ती लवकर लक्षात येत नाही. यामुळे घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये. प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे सर्वांनी पालन करा. विनाकारण रस्त्यावर आलेल्या लोकांवर यापुढेही कारवाई करण्यात येणार आहे. युवा पिढीने कोरोनाचा धोका गांभिर्याने घेण्याची गरज आहे.
– अखिलेश कुमार सिंह, नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक.

- Advertisment -

ताज्या बातम्या