Friday, April 26, 2024
Homeनगरअक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधणे यंदा कठिणच !

अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधणे यंदा कठिणच !

लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद, सोने, वाहन खरेदीचा योग यंदा हुकणार

अहमदनगर (प्रतिनिधी)- यंदा मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा करोनाच्या लॉकडाउनमुळे सुनासुना गेला. अशी अवस्था साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असणर्‍या अक्षय्य तृतीयेची झाली आहे. आजच्या या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तासाठी आंबे, मातीचा घट व अन्य खरेदी केली जात आहे. मात्र, सोने खरेदी, नव घरात प्रवेश, वाहन खरेदीसह अन्य उपक्रमांसाठी मुहूर्त असून तो साधणे करोना संसर्गामुळे कठीण होणार आहे.

- Advertisement -

आपल्या भारतीय संस्कृतीत गुढीपाडवा, अक्षय तृतीया व दसरा (विजयादशमी) हे तीन पूर्ण व दिवाळी पाडव्याचा अर्धा असे साडेतीन मुहूर्त महत्त्वाचे मानले जातात. कोणत्याही नव्या कामाची सुरुवात या मुहूर्तांवर करण्याची परंपरा आहे. गुढी पाडवा व अक्षयतृतीया हे मुहूर्त उन्हाळ्याच्या काळात येतात. त्यामुळे गुढीपाडव्याला शेतीची नांगरणी सुरू होते व अक्षय तृतीयेला पेरणीपूर्वी शेतीची स्वच्छता व अन्य कामे केली जातात. याशिवाय गुढीपाडवा व अक्षय तृतीयेला नव्या वास्तूचा गृहप्रवेश, वास्तूशांती, नव्या प्रकल्पाचे भूमिपूजन, सोने खरेदी केली जाते.

पण यंदाचा गुढीपाडवा करोनामुळे लॉकडाउनच्या काळात आल्याने अनेकांनी घरीच साधेपणाने तो साजरा केला. तशीच स्थिती आता अक्षय तृतीयेचीही आहे. लॉकडाऊन अजूनही सुरू आहे. यातून अत्यावश्यक सेवांना सवलत देण्यात आली असली तरी बाजारपेठा आणि सराफी पेढ्या बंद आहेत, बांधकाम क्षेत्रही म्हणावे तसे सुरू झालेले नाही. त्यामुळे सोने खरेदी अथवा वास्तू प्रवेशाचे कार्यक्रम होण्याची शक्यता कमी आहे. काहींनी वास्तू प्रवेश वा भूमिपूजन करण्याचे ठरवले तरी गर्दी टाळण्याचे आवाहन असल्याने हे कार्यक्रमही साधेपणानेच होणार आहेत.

आंब्याची मागणी घटली
अक्षय तृतीयेला पूर्वजांचे स्मरण करून दान करण्याची प्रथा आहे. तसेच आंबे खाण्याची सुरुवातही याच दिवसापासून अनेकजण करतात. पण त्याआधी त्यांचे दान केले जाते. त्यामुळे यासाठी आंबे व मातीच्या घटांना मागणी आहे. लॉकडाउनच्या शिथिलतेमुळे अनेक ठिकाणी आंबे व मातीचे घट विकणारांभोवती ग्राहकांची गर्दी झाली होती. मात्र, अंब्याला मागणी कमी होती. भावही 100 ते 250 रुपये किलो होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या