ट्रक-मोटारसायकल अपघातात श्रीरामपूर, राहुरी बसस्थानक प्रमुखांचा दुर्दैवी मृत्यू

ट्रक-मोटारसायकल अपघातात श्रीरामपूर, राहुरी बसस्थानक प्रमुखांचा दुर्दैवी मृत्यू

टिळकनगर (वार्ताहर)- ट्रक आणि मोटारसायकल अपघातात अहमदनगर विभागातील श्रीरामपूर बस स्थानकप्रमुख बाळासाहेब कोते (वय-50) आणि राहुरी एसटीचे सहायक वाहतूक निरिक्षक अनिल निकम (वय-40) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास प्रभात दूध डेअरी नजीक घडली.

बाळासाहेब यशवंत कोते (वय 57 रा. शिर्डी, ता. राहाता) व अनिल यशवंत निकम (वय 50. रा.देर्डे कोर्‍हाळे, ता. कोपरगाव) हे दोघेही सकाळी आपल्या राहत्या घरून श्रीरामपूर आगारात आले होते. श्रीरामपूर एसटी आगारातील आपले कर्तव्य बजावून दुचाकीवरून सांयकाळी पाच-साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाभळेश्वर मार्गे शिर्डीकडे निघाले होते. येथील संगमनेर रस्त्यावरील माहेश्वरी स्टील दुकानासमोर अचानकपणे आलेल्या स्टील भरलेल्या माल ट्रक चालकाने अचानक ब्रेक दाबला.

त्यामुळे काही कळण्याच्या आत पाठीमागून त्यांची मोटारसायकल ट्रकवर धडकली. त्यात या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर तेथे मोठी गर्दी जमली होती. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस तसेच आगार प्रमुख ऋषिकेश शिवदे व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरीकांच्या मदतीने त्यांना येथील साखर कामगार रुग्णालयात नेण्यात आले. त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र जगधने यांनी पोलिसांना सांगितले. याप्रकरणी राजेंद्र हाडे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळासाहेब कोते हे साईभक्त. त्यांचे वास्तव्य साईनगरीत असल्याने साईबाबांच्या पहाटेच्या काकड आरतीला नेहमी हजर राहत. निर्व्यसनी, कधीही कोणत्याही कामगाराला अडचणीतून मार्ग काढून देत असत. अधिकारी असतानाही त्यांच्याकडे मीपणा नव्हता. आम्ही चांगल्या अधिकार्‍याला मुकलो अशीच भावना अनेक कामगारांनी व्यक्त केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com