मुलाचा पहिला वाढदिवस; अन् त्याच दिवशी पित्याचा अपघातात मृत्यू
Featured

मुलाचा पहिला वाढदिवस; अन् त्याच दिवशी पित्याचा अपघातात मृत्यू

Sarvmat Digital

लिंपणगावच्या तरुणाचा दौंड-नगर रस्त्यावर अपघात

श्रीगोंदा (तालुका प्रतिनिधी) – नगर-दौंड महामार्गावर निमगाव खलू नजीक अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महादेव अंबादास काळे (वय-28, रा. लिंपणगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.3) पहाटे घडली. दरम्यान, मृत काळे हा आपल्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त येत असलेल्या पाहुण्यांना आणायला जात असतानाच ही दुर्दैवी घटना घडली.

या घटनेबाबत मृत काळे यांचे भाऊ रामकीशन अंबादास काळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तालुक्यातील लिंपणगाव येथील मृत तरुण महादेव काळे यांच्या एक वर्षीय मुलाचा काल पहिलाच वाढदिवस होता. त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी श्रीरामपूरवरून रेल्वेने नातेवाईक दौंड येथे येणार असल्यामुळे महादेव हे आज पहाटे साडेपाच वाजता त्यांची दुचाकी क्र एम एच16 ए एल 3426 हिच्यावरून त्या नातेवाईकांना दौंड रेल्वे स्टेशन येथे घेण्यासाठी निघाले होते.

काल पहाटे साडेपाच ते सात वाजण्याच्या दरम्यान ते दौंड नगर रस्त्यावरील काष्टी नजीक असलेल्या शांताई लॉन्स समोरून दौंडकडे जात असताना कुठल्या तरी अज्ञात वाहनाने महादेव काळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात काळे हे दुचाकीवरून खाली पडले. अज्ञात वाहनाचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा मेंदू बाहेर पडला.

यात महादेव काळे हे जागीच मरण पावले. त्यानंतर या अपघाताबाबत रस्त्याने जाणार्‍या काही लोकांनी मृत काळे यांच्या मोबाईलवरून त्यांच्या भावाला फोन करून माहिती दिली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सहायक फौजदार भानुदास नवले करीत आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com