Thursday, April 25, 2024
Homeनगरअपहरण, खंडणी प्रकरणी सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल

अपहरण, खंडणी प्रकरणी सरपंचासह तिघांवर गुन्हा दाखल

जामखेड (तालुका प्रतिनिधी)- तालुक्यात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला आहे. नागरिक कोरोना व्हायरस भितीच्या वातावरणात असताना गोरगरीब नागरिकांसह अनेकांची खाण्याची पंचायत झाली आहे. लोकांना खायला वेळेवर मिळत नसताना काहींना हॉटेल चालू करायची घाई झाली आहे. त्यातूनच संरपचासह तिंघानी सोमनाथ जगताप यांचे अपहरण करून खंडणी मागतिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल चालवण्याच्या कारणावरून झालेल्या वादात गावठी पिस्तूलचा धाक दाखवत अपहरण करणे, लाकडी दांडक्याने मारहाण करून तक्रारदाराच्या नातेवाईकांकडून दोन लाखांची खंडणी वसूल करणे, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यास ठार मारण्याची धमकी देणे या आरोपांखाली आपटीच्या सरपंचासह एकुण तीन जणांवर अपहरण, खंडणी व आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोमनाथ शिवदास जगताप (वय 24, रा. पिंपळगाव उंडा, ता. जामखेड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आपटीचे सरपंच नंदकुमार प्रकाश गोरे, सचिन बबन मिसाळ व वाल्मिक किसन काळे (सर्व रा. आपटी, ता. जामखेड) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी 25 मार्चला त्याच्या पिंपळगाव उंडा येथील घरी असताना आरोपी त्या ठिकाणी आले. फिर्यादीस हॉटेल चालवण्याच्या कारणावरून सरपंच नंदकुमार गोरे व सचिन मिसाळ या दोघांनी गावठी कट्ट्याचा व पिस्तूलचा धाक दाखवून शिविगाळ व दमदाटी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यांनी आणलेल्या विनानंबरच्या चारचाकी वाहनातून फिर्यादीला सरपंच गोरे यांच्या आपटी येथील शेडवर घेऊन गेले. या ठिकाणी फिर्यादीस लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानंतर फिर्यादीचे वडील व चुलत्यांकडे दोन लाख रुपयांची मागणी करुन खंडणी वसुल केली. त्यानंतर फिर्यादीला सोडून देण्यात आले. तसेच पोलिसात तक्रार केली तर ठार मारण्याची धमकी दिली.

ही घटना 25 ते 26 मार्चदरम्यान घडली आहे. मात्र, फिर्यादी जखमी असल्याने फिर्याद दाखल करण्यास उशीर झाला. सोमनाथ जगताप यांनी रविवारी रात्री जामखेड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळी कर्जतचे उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील व सहाय्यक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी भेट दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण करत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन असताना गावच्या सरपंचाचा सहभाग असलेला हा गुन्ह्याचा प्रकार घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या