शेवगाव : 18 व्यक्तींना तपासणीसाठी पाठविले जिल्हा रुग्णालयात
Featured

शेवगाव : 18 व्यक्तींना तपासणीसाठी पाठविले जिल्हा रुग्णालयात

Sarvmat Digital

परदेशी नागरिकांच्या संपर्कात शेवगाव व अमरापूरकरांचाही समावेश

शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – परदेशी नागरिकांच्या संपर्कात आलेल्या शेवगाव व अमरापूर येथील 18 व्यक्तींना कोरोना तपासणीसाठी नगर येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 3) पाठविण्यात आले आहे. संबंधित व्यक्तींना कोरोनाची कोणतेही लक्षणे प्रथमदर्शनी दिसत नसली तरी खबरदारी म्हणून त्यांना जिल्हा रूग्णालयात पाठविले असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे तालुका आरोग्य विभागाने सांगितले आहे.

जमातीमधे परदेशातून आलेल्या काही व्यक्ती शेवगाव व अमरापूर येथे काही दिवस वास्तव्यास असल्याची माहिती उघड झाली होती. येथून त्या नेवासा येथे गेल्याचे समजते. शुक्रवारी मुख्यत: पोलीस दल, पंचायत समिती आरोग्य विभाग, तहसील, नगरपरिषद यांनी समन्वयाने परदेशी व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांची शोध मोहीम हाती घेतली. यात पोलीस विभागाने महत्वाची भूमिका बजावली.

यानंतर पुढील प्रक्रिया शेवगावचे प्रभारी तहसीलदार भानुदास गुंजाळ, गटविकास अधिकारी महेश डोके, आरोग्यधिकारी डॉ. सलमा हिराणी, ढोरजळगाव आरोग्य उपकेद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील बडे, घोटण उपकेद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल शिरसाठ, विस्तार अधिकारी सुरेश पाटेकर यांनी पार पाडली. बाहेरील देशातून आलेल्या 10 व परप्रांतीय दोन भाषांतरकार यांच्या संपर्कात आलेल्या अमरापूर येथील 4 व्यक्ती तसेच शेवगाव शहरात जमातीत परदेशातील काही व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 14 अशा 18 व्यक्तींना कोरोना निदान करण्यासाठी एसटी बसमधून नगर येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या सर्व संशयित व्यक्तींना कोरोना संसर्गाचे लक्षणे दिसत नसली तरी आरोग्याच्यादृष्टीने तपासणी होणे गरजेचे असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधितांचे तपासणी अहवाल आल्यांनतर स्थिती स्पष्ट होईल. यानंतर तालुक्यात पसरलेली भीती आपोआप कमी होईल. तालुक्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटिव रूग्ण आढळून आला नसून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन तालुका आरोग्याधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी केले आहे. मात्र या व्यक्ती कोण असाव्यात याची तालुक्यातील नागरिकांत चर्चा चालू आहे.

उद्या तालुका पातळीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुका आपत्ती व्यवस्थापनाची बैठक तहसिलदारांच्या उपस्थितीत होत आहे. संपर्कात आलेल्या या 18 व्यक्तींचा शोध घेणे जिकरीचे काम होते. मात्र वरीष्ठ पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व सहकार्‍यांनी अनेक दुव्यांची मदत घेत व युक्त्या वापरत या 18 व्यक्तींची नावे प्रथम शोधून काढली. यासाठी पोलीस दलास काही कार्यकर्त्यांनी मदत केली.

या नंतरचा अहवाल पोलीस अधिक्षक, तहसिलदार व आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला. पोलीस दलाने कमी वेळेत शोध घेण्याचे मोठे काम केल्याने शेवगाव परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, आठरा व्यक्तींना तपासणीसाठी पाठविल्याची वार्ता तालुक्यात वेगाने पसरली.

Deshdoot
www.deshdoot.com