Thursday, May 2, 2024
Homeनगरकोपरगावातून आणखी 15 जणांचे स्त्राव पाठवले कोरोना तपासणीसाठी

कोपरगावातून आणखी 15 जणांचे स्त्राव पाठवले कोरोना तपासणीसाठी

कोपरगाव (तालुका प्रतिनिधी)- शुक्रवारी कोपरगावमध्ये 60 वर्षांच्या महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोपरगावात खळबळ उडाली. त्यानंतर आरोग्य विभागाने वेगाने पावले उचलत संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आणखी 15 जणांना ताब्यात घेऊन त्यांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी अहमदनगरला पाठविले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष विधाटे यांनी दिली.

याबाबत माहिती देताना डॉ. विधाते यांनी सांगितले, बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची प्राथमिक माहिती आम्ही मिळविली असून त्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांचे स्त्राव नमुने तपासण्यास पाठविले आहे. त्याचप्रमाणे त्या भागातील आरोग्य सर्व्हे सुरु केला असून त्याकरिता 3 आरोग्य कर्मचार्‍यांच्या 10 टीम बनविल्या असून त्याद्वारे साधारण 1 हजार घरांची संपूर्ण तपासणी केली जात आहे. तसेच शहरामध्ये आणखी कोणी संशयित आहे काय याचाही शोध घेत आहोत. या दरम्यान जनतेनेही काही माहिती त्यांच्याकडे असल्यास प्रशासनास कळवावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

काल शुक्रवारी कोपरगावातील पहिल्या कोरोना रुग्णाची पुष्टी झाल्यानंतर प्रशासनाने शहरातील लक्ष्मीनगर उपनगर रात्री संपूर्णतः सील केले असून शहरात पूर्ण संचारबंदी लागू केली आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवासुद्धा पूर्णपणे बंद केल्या आहे. भाजीपाला, दूध, मेडिकल, पेट्रोल पंप आदी सर्व सेवा बंद केल्याचे रात्री उशिरा ध्वनिक्षेपकावरून जाहीर केले.

शुक्रवारी रात्री उशिरा शहर व तालुका अत्यावश्यक सेवेसह बंद केल्याने सकाळी नागरिकांच्या अत्यावश्यक वस्तू साठी हाल झाले. त्यात सकाळी दूध विक्रेते शहरात दाखल झाले. मात्र प्रशासनाने त्यांना परत पाठवल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. अचानक बंद झाल्याने आर.ओ. पाणी पिणार्‍यांचे हाल झाले. हे लक्षात घेऊन प्रशासनाने पिण्याचे पाणी घरपोच देण्यास मान्यता दिली.

शुक्रवारी रात्री उशिरा संपूर्ण लक्ष्मी नगर परिसर बॅरिगेट लावून सील करण्यात आला. संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. तसेच शहरातील सर्व अत्यावश्यक सेवा देखील 14 तारखेपर्यंत बंद करण्यात आल्या असून नागरिकांनी कुठल्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. अन्यथा नाईलाजाने नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.स्वतःच्या घराची व आरोग्याची काळजी घ्यावी. 

– प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, कोपरगाव नगरपालिका.

- Advertisment -

ताज्या बातम्या