बारावीची पाठ्यपुस्तके ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर
Featured

बारावीची पाठ्यपुस्तके ई-बालभारतीच्या संकेतस्थळावर

Sarvmat Digital

संगमनेर- देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यात 12 वी ला जाणार्‍या विद्यार्थ्यांच्या समोर पाठ्यपुस्तक बदलत असल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. या संदर्भात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. मात्र सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात राज्यभर पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देणे शक्य नसल्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यासंदर्भात सोमवारी राज्याचे वरिष्ठ अधिकारी राज्याचे शिक्षण मंत्री, राज्याचे शालेय शिक्षण विभागाचे अप्पर सचिव यांच्यासोबत झालेल्या झूम मिटिंगमध्ये या संदर्भातला प्रस्ताव चर्चेला आला होता. त्यानंतर शिक्षणमंत्र्यांनी त्यावर तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते ते आदेशाचे पालन करत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाच्यावतीने त्यांच्या संकेतस्थळावर ती इयत्ता बारावी कला वाणिज्य व विज्ञान शाखेच्या बदलेल या सर्व विषयांची पाठ्यपुस्तके पीडीएफ स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

विद्यार्थी पालक शाळा यांना बारावी ची सर्व विषयांची पाठ्यपुस्तके http;// www.ebalbharti.in/ या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.  शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तात्काळ निर्णय घेऊन पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टळणार आहे.
नवे शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी नवी पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी असल्यामुळे विद्यार्थी व पालकांना घराबाहेर निघणे शक्य होत नाही. या कालावधित अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर आकाशवाणी, दूरदर्शनच्या माध्यमातून अभ्यासाचे साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील चाचपणी सुरु आहे.

ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमधे मराठी. हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र. माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. या सर्व पुस्तकां सोबत युवकभारती मराठी (मराठी), संस्कृत – अल्हाद (संस्कृत), पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी- प्राकृत (मराठी), महाराष्ट्री प्राकृत (मराठी), युवकभारती – हिंदी (हिंदी), युवकभारती – बंगाली (बंगाली), युवकभारती – इंग्रजी (इंग्रजी), युवकभारती-गुजराती (गुजराती), युवकभारती – उर्दु (उर्दु), युवकभारती – सिंधीन (अरेबिक), युवकभारती – सिंधी (देवनागरी), युवकभारती- कन्नड (कन्नड), युवकभारती – तेलुगु (तेलुगु), शिक्षणशास्र (मराठी, इंग्रजी), पर्शियन – गुल्हा ए फारशी (उर्दु), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दु), तर्कशास्र (इंग्रजी) बालविकास (इंग्रजी), भौतिकशास्र(इंग्रजी), रसायनशास्र (इंग्रजी), जीवशास्त्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग 1) (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (कला व विज्ञान भाग 2) (इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग 1)(इंग्रजी), गणित व संख्याशास्त्र (वाणिज्य भाग 2 ) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी), वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (मराठी, इंग्रजी), चिटणीसाची कार्यपद्धती (मराठी, इंग्रजी), अर्थशास्त्र (मराठी, इंग्रजी), जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी, इंग्रजी), इतिहास (मराठी), राज्यशास्त्र (मराठी, इंग्रजी), माहिती तंत्रज्ञान – विज्ञान (इंग्रजी) आदी विषयांची पुस्तके संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

अभ्यास करणे होईल शक्य
सध्याच्या पार्श्वभूमीवरती 14 तारखेपर्यंत लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत सरकारने त्याचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातच लॉक डाऊन उठवला, तरी पुढील दोन आठवडे जिल्ह्यांच्या सीमा बंद ठेवण्याचे नियोजन असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवरती बालभारती च्या वतीने राज्यभर सर्वत्र पाठ्यपुस्तकाचा पुरवठा करणे शक्य होणार नाही असे दिसते आहे. राज्यात पाठ्यपुस्तके उपलब्ध करण्यासाठी मे महिन्याचा मध्य उजाडण्याची शक्यता आहे. दरम्यान 11 वी परीक्षा झाल्यानंतरच बारावीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेस सुरू होतात. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या दृष्टीने संकेतस्थळावरती पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे प्रा. मारुती कुसमुडे यांनी सांगितले.

पाठ्यपुस्तकात राहीबाई
इयत्ता बारावीची पाठ्यपुस्तके नव्याने यावर्षी अभ्यासक्रमात दाखल होत आहेत. त्यात बारावीच्या जीवशास्त्राच्या पुस्तकात बीज माता राहीबाई यांच्या बियाणे रक्षणासंदर्भात टिपण देण्यात आले आहे. तर बारावीच्या मराठी प्रथम भाषेच्या पुस्तकात वृत्तलेख यात व्यक्तिवाचक वृत्त लेखासाठी पद्मश्री पोपटराव पवार व राहीबाई पोपेरे यांचा संदर्भ लेखनासाठी देण्यात आला आहे. या निमित्ताने नगर जिल्ह्यातील दोन व्यक्तिमत्त्वांचा पाठ्यपुस्तक संदर्भित समावेश आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com