कुकडी कालवा समितीच्या बैठका परस्पर कशा होतात ?
Featured

कुकडी कालवा समितीच्या बैठका परस्पर कशा होतात ?

Sarvmat Digital

खा. डॉ. विखे पाटील कडाडले : 17 टीएमसी पाणी कुठे जाते, याचा शोध घेऊ

अहमदनगर (प्रतिनिधी)- कालवा सल्लागार समितीच्या बैठका परस्पर होतात, ही बाब अतिशय गंभीर आहे. पाणी द्या, पाणी द्या, म्हणत असताना किती बैठका घ्यायच्या आहेत. त्यातून काही फलित होणार नसेल तर त्याचा उपयोग नाही. त्यामुळे कुकडी आवर्तनाचे नियोजन योग्य पद्धतीने झाले पाहिजे. तुमच्या अडचणी मला मान्य आहेत. मात्र जनतेचे हाल यातून होता कामा नये, अशा सक्त सूचना खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिला. आगामी काळामध्ये शेतकर्‍यांच्या समवेत बैठक घेण्यासाठी त्या त्या तालुक्यात नियोजन करावे, असा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गुरूवारी दि. 2 जानेवारीला झाली. यावेळी आ. बबनराव पाचपुते, कार्यकारी अभियंता स्वप्निल काळे, कार्यकारी अभियंता प्रशांत कडुस्कर, कार्यकारी अभियंता आर. के. जगताप, नामदेव राऊत, अशोक खेडकरसह सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार विखे म्हणाले, कालवा समितीच्या बैठका परस्पर घेणे अतिशय गंभीर आहे. आवर्तन सुटणार असल्याचे मला आत्ताच कळाले आहे. त्यामुळेच मी ही बैठक तातडीने घेतली. आगामी काळामध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन करताना विरोधी पक्ष असो किंवा सत्ताधारी पक्ष असो, यात ताळमेळ घालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्या क्षेत्रामध्ये कुकडीचे पाणी जाते, तेथील स्थानिक आमदारांना सुद्धा विश्वासात घ्या. मला कोणत्याही प्रकारे पाण्याचे श्रेय घ्यायचे नाही व घेणारे नाही. जनता भरडली जाऊन नये, हाच माझा उद्देश आहे.

कुकडीचे आवर्तन सोडताना शेवटच्या घटकापर्यंत पाणी कशा पद्धतीने मिळेल, त्याचे नियोजन दरवेळेला होते. प्रत्येकदा अनेक राजकीय घडामोडी त्यामध्ये घडतात, त्याचाही आम्ही आता शोध घेणार आहोत. सतरा टीएमसी पाणी नेमके जाते कुठे, याचा सुद्धा आम्ही शोध घेणार आहोत. पाण्यासाठी आज सगळ्यांना सातत्याने मागणी करावी लागते, ही बाब योग्य नाही, आपण बैठक घेतो, नियोजन करतो, पण त्याचा उपयोग खर्‍या अर्थाने होतो का, हा खरा प्रश्न आहे. जर नियोजन होणार नसेल तर बैठका घेऊन काय उपयोग?

खा. विखे म्हणाले, मी तुम्हाला पाण्याची उपलब्धता करून देतो, तुम्हाला वेळ प्रसंगी माझ्याकडील शंभर माणसे सुद्धा देतो, पण पाणी प्रत्येकापर्यंत पोहोचलेच पाहिजे. यासाठी तुम्हाला वेळ प्रसंगी कारवाईची गरज पडल्यास, ती करावीच लागेल. त्यासाठी तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन करा. अगोदर पिण्याच्या पाण्याचे नियोजन करा, पिण्याच्या पाण्याला कोणतेही निकष नाहीत, हे लक्षात ठेवा. कोणीही पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहता कामा नये. अनेक ठिकाणी चार्‍यांची दुरुस्ती झालेली नाही, हीसुद्धा बाब लक्षात घेण्यासारखी आहे. त्यासाठी तात्काळ दुरुस्तीची कामे हाती घ्या, असेही विखे यांनी यावेळी सांगितले.

साकळाई सिंचन योजनेचा सर्व्हे करण्यासंदर्भातील निर्णय झालेला आहे. मात्र आता सरकार बदलले आहे. त्यामुळे कोणाकडे कोणते खाते येते, हे स्पष्ट झाल्यानंतर आपण सर्वेक्षणाबाबत निश्चितपणे पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार डॉ. विखे यांनी यावेळी दिली.

Deshdoot
www.deshdoot.com