इको सेन्सीटीव्ह झोनचे अंतर कमी करण्यात यावे – आ. पवार

इको सेन्सीटीव्ह झोनचे अंतर कमी करण्यात यावे – आ. पवार

कर्जत (तालुका प्रतिनीधी)- वनविभागाच्या हद्दीपासून इको सेन्सेटीव्ह झोनमध्ये 10 कि. मी.च्या मर्यादेमध्ये विकासकामे करण्यास निर्बंध येत असल्याने तालुक्यातील अनेक रस्ते, उद्योग, खाणकाम यासारखी विकासकामे बर्‍याच कालावधीपासून प्रलंबित आहेत. हे वन परिक्षेत्रातील 10 कि.मी. निर्बंधाचे मोठे अंतर कमी करून येथील प्रलंबित विकासकामे करण्याच्यादृष्टीने आमदार रोहित पवार यांनी नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक काकोडकर यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.

यावेळी आ. रोहित पवार यांनी उपस्थित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करताना इको सेन्सेटीव्ह झोन मर्यादेचे सुमारे 10 कि.मी.चे अंतर कमी करण्यात यावे. या प्रमुख मागणीसोबतच वनविभागाशी संबंधित मतदार संघातील इतर समस्यांबाबतही चर्चा यावेळी करण्यात आली. वनविभागाच्या हद्दीतून ग्रामस्थांना रस्ते, वन परिक्षेत्रातील गावांचे ग्रामविकास आराखडे, वनविभागाच्या विविध योजनांसाठी प्रलंबित निधी व नव्याने योजना राबविण्यासाठी मागणी अशा अनेक विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.

तालुक्यातील पाणी वितरणासाठी महत्त्वाचा विषय असलेल्या तुकाई चारीच्या कामाकरिता वनविभागाच्या हद्दीतील क्षेत्राचा प्रस्तावही लवकर मंजूर करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. वन परिक्षेत्रातील 10 कि. मी. निर्बंधाचे मोठे अंतर कमी करण्याबाबतचा प्रस्ताव येत्या काही महिन्यांत लवकरच मंजूर होऊन येथील सर्व प्रलंबित विकासकामे पूर्ण होतील व त्याकरिता केंद्र शासनाकडेही आपण पाठपुरावा करणार असल्याचे यावेळी आमदार रोहित पवार यांनी सांगितले.

तालुक्याच्या विकासाला मिळणार गती !
आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळत आहे.कुकडी भूसंपादन, अस्तरीकरण यांसह आता इको सेन्सिटिव्ह झोनचे अंतर कमी करण्यास आमदार पवार यांनी लक्ष घातले असून प्रलंबित प्रश्न सुटण्यास सुरुवात झाली आहे.त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे मतदारसंघाच्या ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com