Featured

जॉन डिस्टिलरीच्या कंत्राटी कामगारांना ब्रेक

Sarvmat Digital

कामगारांच्या न्यायासाठी ग्रामस्थ आक्रमक

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील चितळी येथील जॉन डिस्टिलरीने उद्या नवीन वर्षापासून 50 कामगारांना ब्रेक देण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कामगारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाल्याने याविरुद्ध स्थानिक ग्रामस्थांनी आरपारची लढाई करण्याचा इशारा दिला आहे.

पन्नास वर्षांपूर्वीपासून चितळी येथे मद्य निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. प्रारंभी शासनाच्या अंगीकृत प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांना न्याय मिळेल, स्थानिक बाजारपेठ सुधारेल, अशीच ग्रामस्थांची भावना होती. त्यासाठी स्थानिक शेतकर्‍यांनी कवडीमोल दराने शेकडो एकर जमीन या प्रकल्पासाठी दिली. परंतु हा दारूचा उद्योग येथे सुरू झाल्यापासून स्थानिक ग्रामस्थांमागे साडेसाती लागली आहे.

सुरुवातीस येथील सुपीक जमीन दारू कारखान्याच्या स्पेंट वॉश (मळी) मुळे नापीक झाली. त्यानंतर परिसरातील विहिरींचे पाणी पिण्यायोग्य व शेतीयोग्य राहिले नाही. त्यामुळे शेतकर्‍यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. दुसर्‍या बाजूला शासनाचा हा अंगीकृत प्रकल्प पश्चिम विकास महामंडळानंतर थेट खासगी व्यक्तीला विकण्यात आला. नेहमीच नफ्याची आकडेमोड दाखविणारा प्रकल्प खासगी मालकासाठी फायदेशीर असला तरी त्यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्त, प्रदूषणग्रस्त, अनुकंपाखाली नोकरीमध्ये घेतलेल्या मुलांना दुजाभावाची वागणूक दिली आहे.

जॉन डिस्टिलरीमध्ये सध्या 36 कायम कामगार असून 42 तांत्रिक कामगार काम करतात. याशिवाय 50 कामगार कंत्राटी पद्धतीने काम करतात. या कामगारांमध्ये भेदाभेद करून व्यवस्थापनाने 50 कंत्राटी कामगारांना उद्या 1 जानेवारी पासून कामावर येऊ नये, असा संदेश ठेकेदारामार्फत पाठविला आहे.

कंपनीच्या या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध स्थानिक ग्रामस्थ एकवटले आहेत. वारंवार कंपनी बंद करणे किंवा कामगारांना कामावरुन कमी करण्याबाबत व्यवस्थापनाकडून ग्रामस्थांना धमकीवजा संदेश मिळत होते. परंतु स्वत:चे सामाजिक दायीत्व विसरून केवळ नफातोट्याच्या नावाखाली स्थानिक कामगारांना कामावरुन कमी करणे अन्यायकारक आहे. याविरुद्ध नागरिक शांत राहणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

नफातोट्यामुळे कामगारांवर अन्याय नको : सरपंच वाघ
आज राज्यात मोलासेस (मळी) चा तुटवडा आहे. चालू वर्षी प्रचंड पाऊस झाल्यामुळे पुढच्या वर्षी साखरेचे अतिरिक्त उत्पादन होणार आहे. त्यावेळी कमी दरामध्ये मुबलक मळीची उपलब्धता होऊन जॉन डिस्टिलरीला मोठा आर्थिक लाभ होणार आहे. तसेच मोलासेस निर्यातबंदीचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे नफातोट्याच्या नावाखाली कामगारांवर अन्याय करू नये, असे मत लोकनियुक्त सरपंच दीपालीताई वाघ यांनी व्यक्त केले.

श्याम चूग यांची भूमिका असहकार्याची
स्वत:च्या दारू निर्मिती कारखान्यामुळे चितळी परिसरातील शेतजमिनी, पिण्याचे पाणी दूषित झाले. कंपनीतील विषारी वायुमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना जॉन डिस्टिलरीचे मालक म्हणून काम करत असलेले श्याम चूग यांची भूमिका अन्यायकारक आहे. यापूर्वी शासनासह जॉन यांनी स्थानिक ग्रामस्थ व कामगारांना सहकार्याची भूमिका घेतली. मात्र चूग हे वारंवार नफातोट्याचा हिशोब मांडून स्वार्थाची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी नानासाहेब वाघ, बाबासाहेब वाघ, संदीप वाघ आदींसह अनेक प्रदूषणग्रस्त शेतकर्‍यांनी केला आहे.

कंपनीला कुलूप लागले तरी माघार नाही : सुरुडे
मार्च 2019 मध्ये कायम कामगारांबरोबर कंत्राटी कामगारांच्या मदतीने चितळी येथील जॉन डिस्टिलरीला सर्वाधिक उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणावर नफा मिळाला. त्यामुळे आज कंपनीचे उत्पादन बंद असले तरी कामगारांना वार्‍यावर सोडणे गैर आहे. यापूर्वी असा प्रसंग आला होता. त्यावेळी याच कंपनीने 15 दिवस कामगारांना काम दिले. यावेळी असा अन्यायकारक निर्णय घेतला तर कंपनीला कुलूप लागले तरी माघार घेणार नाही, असा इशारा महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाचे राज्य सचिव जीवन सुरुडे यांनी दिला.

Deshdoot
www.deshdoot.com