Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedआठवणी – सभागृह झाले सुने सुने …!

आठवणी – सभागृह झाले सुने सुने …!

अनिल पाटील
मो. 9307039648

सध्या लॉकडाऊनमुळे सर्वच कार्यक्रमांवर बंदी असल्याने शहरातील सर्व सभागृहे लॉक झाली आहेत. जळगाव शहरात अनेक सभागृह आहेत. त्यापैकी काही कालबाह्य झाली आहेत तर अनेक सभागृहांत आता कार्यक्रमच होत नाही. आयोजकांचा कल नव्या सभागृहाकडे असल्याने जुने हॉल सुने झाले आहेत. जळगावच्या व.वा. वाचनालयाची ऐतिहासिक परंपरा असून वाचनालयाचा पूर्वीचा टाऊन हॉल म्हणजे आताचे लोकमान्य टिळक सभागृह. या हॉलसाठी दात्यांनी 4000 रुपये देणगी दिली. 4 जून 1907 रोजी मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड ल्यामिंग्टन यांच्या हस्ते नेशील बसविण्यात आली. 1909 साली बांधकाम पूर्ण झाले. या सभागृहाला ल्यामिंग्टन टाऊन हॉल असे नाव दिले होते. स्वातंत्र्यानंतर लोकमान्य टिळक सभागृह असे नामकरण झाल्याची इतिहासात नोंद सापडते.

वाचनालयात अग्रवाल सभागृह व एक नवीन सभागृह बांधण्यात आले आहे. जळगाव नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश कालखंडातील असल्याने तत्कालीन पालिकेच्या महात्मा गांधी सभागृहाला शतकोत्तर परंपरा आहे. पालिकेच्या व्यतिरिक्त इतर सभा व सांस्कृतिक कार्यक्रमांना हे सभागृह दिले जात असे. लोकहितवादी मंडळाची व्याख्यानमाला याच हॉलमध्ये होत असे. सुरेशदादा नगराध्यक्ष असताना पालिकेच्या अनेक सभांना आस्मादिकांची हजेरी असायची. काँग्रेसच्या दिगग्ज नेत्यांच्या सभांचे साक्षीदार असलेले काँग्रेस भवनातील म. गांधी सभागृह आता सुनाट आणि जुनाट झाले आहे.

- Advertisement -

बळीरामपेठेत असलेल्या भगिनी मंडळाच्या सभागृहाला शतकोत्तर परंपरा आहे. बालगंधर्व नाट्यगृहातही यापूर्वी अनेक सभा झाल्या आहेत. त्याच काळात कोर्ट चौकात बांधलेल्या पंजाबराव देशमुख कृषक भवनाच्या वरच्या मजल्यावर छोटेखानी सभागृह होते. जळगाव आकाशवाणी केंद्राच्या संगीत मैफिली येथे झाल्या आहेत. पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांच्या मैफिलिस मी उपस्थित होतो. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या शेजारी असलेले पोलीस मल्टिपर्पज सभागृह फारच जुने आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत विभागाचे सभागृह आणि अलीकडेच उभारण्यात आलेल्या नियोजन विभागाच्या नवीन सभागृहाने सांस्कृतिक वैभवात भर घातली आहे.

1985 मध्ये जिल्हा बँकेच्या अप्पासाहेब जे. एस. पाटील सभागृहात 25 वर्षात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम झाले आहेत. याच काळात ला. ना. सार्वजनिक विद्यालयात वासुदेव विठ्ठल गंधे यांच्या समरणार्थ प्रशस्त सभागृह उभारले आहे. येथेही कार्यक्रमांची रेलचेल असते. लेवा बोर्डिंगचे सरस्वती सभागृह आणि बेंडाळे महिला महाविद्यालयाचे धांडे सभागृह तेथे आहे. शिवाय रोटरी, आय. एम. ए., लायन्स क्लब यांचीही सभागृहे शहरात आहेत. पण लॉकडाऊनमुळे कार्यक्रम नाहीत, म्हणून तिकडे कुणी फिरकतदेखील नाही. ना आता कुठले सेल लागतात, ना कुठले प्रदर्शन भरतात. सारे कसे सुने सुने झाले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या