Featured

अंत्ययात्रेतील गर्दीमुळे वाढला धोका

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगावातील मृताचा अहवाल पॉझिटिव्ह

जळगाव शहरातील तांबापूर परिसरामधील एका 45 वर्षीय कोरोना संशयित रुग्णाचा मृत्यू रविवारी दुपारी जिल्हा कोविड रुग्णालयात झाला आहे. त्यास इतरही आजार होते. त्यासाठी खासगी दवाखान्यातही उपचार घेण्यात आलेले होते.

परंतु, अचानक त्रास वाढल्यामुळे त्यास रविवारी दुपारी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यास कोरोनाचे लक्षणे जाणवत असल्यामुळे डॉक्टरांनी लांबून औषधोपचार केले. त्याचे स्वॅबही घेण्यात आले होते. अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला.

या रुग्णावर योग्यरित्या उपचार झाले नाहीत. डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला, असा आरोप त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी केला होता. त्यामुळे जिल्हा कोविड रुग्णालयात बराच वेळ गोंधळ झाला होता. नंतर त्याच्यावर शासनाच्या प्रोटोकॉलनुसार अंत्यविधी करण्याच्या सूचना वैद्यकीय सुत्रांनी दिल्या होत्या. मात्र, नातेवाईक, परिचित मंडळीने काळजी न घेता अंत्ययात्रेत प्रचंड गर्दी केली होती.

पोलिसांनी या गर्दीचे फोटो काढून व्हीडीओ शुटींग केली आहे. गर्दी करणार्‍या संबंधितांवर कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. त्यानंतर या मृताचा मंगळवारी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्या मृताच्या हायरिस्कमधील संपर्कातील नातेवाईवाईक, अंत्ययात्रेतील सहभागी मंडळींबाबत धोका वाढला आहे. आता अंत्ययात्रेत गर्दी करणार्‍या संबंधितांवर पोलिसांचे कारवाई सत्र सुरू झाले आहे.

आरोग्य पथक परतले माघारी

तांबापूरमधील मृताचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या भागात महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक मंगळवारी दुपारी पोलीस बंदोबस्तात उपाययोजना करण्यासाठी गेले होते. परंतु, त्या भागातील नागरिकांनी आरोग्य विभागाच्या पथकाला सहकार्य केले नाही.

अनेकांनी अधिकारी, कर्मचार्‍यांशी वाद घातला. आरोग्य विषयक तपासणी, सर्वेक्षण, एरिया सॅनिटराइज, परिसर सील करणे अशा कामात अनेक नागरिकांनी अडथळा आणला. त्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी आता बुधवारी अधिक पोलीस बंदोबस्त घेवून उपाययोजना राबवणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com