तहसीलदारांसह अन्य अधिकार्‍यांना धक्काबुक्की
Featured

तहसीलदारांसह अन्य अधिकार्‍यांना धक्काबुक्की

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात रेशनवरील धान्यप्रकरणी दोन जणांनी इतर नागरिकांना भडकावले आणि चक्क तहसीलदार वैशाली हिंगे व इतर अधिकार्‍यांना धक्काबुक्की बुधवारी दुपारी 12.45 वाजेच्या सुमारास केली. याबाबत मोबाइलवर शुटींग करीत ते फेसबवर व्हायरल केले. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत तहसीलदार वैशाली विकासराव हिंंगे (वय 46) यांनी फिर्याद दिली. तहसील कार्यालयाच्या आवारात केशरी कार्डधारक नागरिकांनी गर्दी केली होती. तहसीलदार हिंगे या त्यांच्या चेंबरमध्ये बसलेल्या असताना चेंबरचा मागचा दरवाजा ढकलून नागरिकांनी गोंधळ घातला.

त्यात एक जण गर्दीला उद्देशून ओरड होता. सर्वांनी तक्रार करा, शुटींग करुन हा विषय फेसबुकवर लाइव्ह व्हायरल करतो, असे तो बोलत होता. तहसीलदारांनी त्यास कार्डाबाबत विचारले असता त्याने केेशरी कार्ड दाखवले.

त्यावर अंंतोदय अथवा कुठलाही प्राधान्याचा शिक्का नव्हता. तरीही तो धक्काबुक्की करीत चेंबरमध्ये शिरला. त्यास धान्य देय नाही आणि उर्वरित एपीएलचे धान्य मे महिन्यात येईल, असे सांगितले. तरीही त्याची आरडाओरड थांबत नव्हती.

वाद व्हायरल

धान्यसंदर्भात नागरिकांची समजूत काढली. त्याच वेळी दुसर्‍या व्यक्तीनेही येवून आरडोओरड केला. त्याला धान्य देय नव्हते, तरी तो धान्यासाठी आग्रह करीत होता. तो अधिकार्‍यांच्या दिशेने धावून येत होता. शुटींग करायला विरोध केला असता त्याने तहसीलदारांसह इतर अधिकार्‍यांना धक्काबुक्की केली. एकाने शुटींग फेसबुकवर टाकलेली होती.

पोलिसांना पाचारण केले असता त्यांनी दोन जणांना ताब्यात घेतले. दोघांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तहसीलदारांसोबत हुज्जत घालणार्‍या कैलास महारू सोनवणे (वय 50, रा.मोहाडी, ह.मु.हरिओमनगर, जळगाव) व शेख युनुस शेख अजीज (वय 32, उस्मानिया पार्क) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग व इतर कायद्यांचेही उल्लंघन केले आहे. तसेच दोघांनी शासकीय कामात अडथळा आणला, याबाबत गुन्हा दाखल झाला आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com