बोधकथा : संवाद

jalgaon-digital
3 Min Read

  – डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी, जळगाव

रविंद्रनाथ देवेंद्रनाथ टागोर हे भारतातील महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ व श्रेष्ठ कवी म्हणून होऊन गेले. त्यांनी राष्ट्रीय शिक्षणाची दिशा विस्तृतपणे ‘शांनीनिकेतन’ संस्थेमध्ये अंमलात आणून काव्य, गायन, नृत्य, चित्रकला यात भारताचे वैशिष्ट्य काय आहे, हे सार्‍या जगाला दाखविले. 1912मध्ये त्यांचा गीतांजली हा कवितासंग्रह प्रसिध्द झाला. त्यांनी स्वतःच बंगालीत लिहिलेल्या ‘गीतांजली’चे इंग्लिशमध्ये भाषांतर केले. त्या कवितासंग्रहाचे कौतुक यीस्टस, ब्रॅडले, बर्नार्ड शॉ, एच.जी. वेल्स या पाश्चात्य साहित्यिकांनी केले. सन 1913मध्ये भारतातील या कलाकृतीस नोबेल पारितोषिक मिळाले. आशिया खंडातील साहित्यिकास हे पारितोषिक प्रथमच मिळत होते. रविंद्रनाथ महाकवी झाले. भारतात सर्वत्र त्यांचे नाव गर्जू लागले. साहित्य क्षेत्रातील हे जगातील सर्वोच्च पुरस्कार होता. देशातील त्यांना अभिनंदनाचे प्रचंड संख्येने संदेश जसे आले तसेच जगभरातूनही आले. त्यांच्या घरी तर भेटणार्‍याची रांगच लागली होती. गीतांजलीतील कवितांचे वाचन, गायन, पठण, पाठांतर होऊ लागले. भारतातील सर्व भाषांत ‘गीतांजली’चा अनुवाद झाला. कुठून कुठून लोक येत असत. हार, गुच्छ, शाल, श्रीफळ आणत.

रविंद्रनाथांचा स्पर्श अनुभवत, शब्द अनुभवत. त्यांना पदस्पर्श करुन अभिनंदन करीत. त्याचा एक शेजारी होता. तो हे सगळं टकामका बघत होता. तो अभिनंदन करण्यासाठी आला तर नाहीच. पण नमस्कारही दुरुन का होईनाही केला नाही. दृष्टीत मार्दव वा प्रेम तर नव्हतेच.  फक्त टकामका बघत असे. त्याच हे वागणं टागोर विसरायचा प्रयत्न करती. पण ते विसरत नसत. ते त्याच्याबद्दलच वारंवार विचार करीत. त्यांना रागही येई. दुसर्‍या दिवशी सकाळी ते समुद्रकिनारी फिरायला गेले. सूर्याच्या किरणांनी समुद्र चांदीसारखा चमकत होता. टागोर भावविभोर होऊन समुद्राच्या लाटा बघत होते. तेवढ्यात त्यांची नजर जवळच्या पाण्यानं भरलेल्या एका खड्डयाकडे गेली. खड्ड्यातील पाणीही चमकत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आले. सूर्यानं तर सर्वांवर सारखीच किरण पसरली आहेत. त्यानं जर समुद्र व खड्डा यांच्यात भेद केला नव्हता. टागोर अंतुर्मख झाले. विचार करु लागले. मी का उगाच शेजार्‍याची वारंवार आठवण करावी? मला का क्रोध यावा? त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. त्यानं उदारता सोडली तर आपण का सोडावी? ते परत आले. त्वरित शेजार्‍याच्या घरी गेले. तो चहापान करीत होता. टागोरांनी त्याच्या चरणांना स्पर्श केला. शेजार्‍याच डोळे डबडबून आले. तो म्हणाला, ‘तुमच्यासारख्या देवतुल्य व्यक्तीला ‘नोबेल’ मिळायलाच पाहिजे होते.’ त्याने टागोरांच्या चरणांना स्पर्श केला. दोघांमधील अंतर दूर झाले.

संवाद साधण्यासाठी आपणच पुढाकार घ्यावा.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *