Thursday, April 25, 2024
Homeजळगावमहेश नवमी विशेष : राष्ट्रउभारणीत माहेश्वरी समाजाचे योगदान मोठे

महेश नवमी विशेष : राष्ट्रउभारणीत माहेश्वरी समाजाचे योगदान मोठे

देशात 10 लाखांपेक्षा कमी असलेला माहेश्वरी समाजाने शिक्षण, आरोग्य, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकारण, न्यायव्यवस्था, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे. राष्ट्रउभारणीच्या कार्यात हा समाज नेहमीच पुढे राहिला आहे. महेश नववी हा माहेश्वरी समाजाचा उत्पत्ती दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त समाजाच्या प्रगतीचा व इतिहासाचा घेतलेला हा आढावा…

‘माहेश्वरी समाज’ अर्थात भगवान महेशाच्या आशीर्वादाने जन्मलेला समाज. मूळ राजस्थानी समाज, परंतु वर्तमानात भारतातील विविध राज्यात व जगभरातील अनेक देशात स्थायिक असलेला समाज. स्थानिक संस्कृतीशी एकरूप होऊन एकनिष्ठ राहणारा समाज म्हणजे माहेश्वरी समाज. मूळभाषा जरी मारवाडी असली, तरी स्थानिक भाषा आत्मसात करून अस्खलित बोलणारा समाज म्हणजे माहेश्वरी समाज. संपूर्ण भारतात या समाजाची जनसंख्या 10 लाखांपेक्षाही कमी असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. समाजाची संख्या जरी खूप कमी असली, तरी राष्ट्रउभारणीत समाजाचा मोठा वाटा आहे.

- Advertisement -

भारतीय स्वातंत्र्य युध्दात समाजभूषण घन:श्यामदास बिर्ला, तपोधन श्रीकृष्णदास जाजू, विदर्भ केसरी ब्रिजलाल बियाणी, क्रांतिवीर मगनलाल बागडी, शहीद श्रीकृष्ण सारडा, रामकिसन धूत, गोविंददास मालपाणी, दामोदरदासजी राठी, रामगोपाल माहेश्वरी यांच्यासह हजारो समाज बंधू-भगिनींनी सक्रिय सहभाग घेतला होता. माझ्या माहितीतील स्व. सीतारामभाई बिर्ला, स्व.आनंदराम बाहेती यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील 50 पेक्षा जास्त माहेश्वरी बांधवांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेत तुरुंगवासही भोगलेला आहे.

भारतीय स्वातंत्र्य युध्दानंतर स्वतंत्र भारताच्या उभारणीतसुध्दा माहेश्वरी समाजाचे मोठे योगदान आहे. विद्यमान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला व खासदार सुभाष बहेडिया, माजी खासदार किरण माहेश्वरी, माजी सरन्यायाधीश अ‍ॅड. रमेश लाहोटी आदी सन्माननीय व्यक्तिमत्त्व म्हणजे माहेश्वरी समाजाचीच देण आहे.

मूळत: व्यापारी समाज असलेला माहेश्वरी समाजाने उद्योग जगत, शिक्षण क्षेत्र, वैद्यकीय, अभियांत्रिकी, सनदी लेखापाल, वकिली, कर सल्लागार, साहित्यक्षेत्र इ. अनेक क्षेत्रातसुध्दा अग्रस्थानी आहे. इतक्या छोट्याशा समाजाद्वारे भारतात सर्वत्र शाळा, महाविद्यालये, धर्मार्थ दवाखाने, मंदिर, धर्मशाळा, मंगल कार्यालये, विद्यार्थी वसतिगृहे आदी समाजोपयोगी संस्था उभारणीत सिंहाचा वाटा उचलला आहे. गतवर्षी जोधपूर येथे ना.नितीन गडकरी यांनी राष्ट्रउभारणीत समाजाच्या व विशेषत्वाने युवा शक्तीच्या योगदानाविषयी गौरवोद्गार काढले होते तर ना.गजेंद्रसिंह शेखावत यांनी भारताला विश्वगुरू बनविण्याच्या दिशेने समाज कार्यरत असल्याचे म्हटले होते.

या समाजाचा घेण्यापेक्षा देण्यावर विश्वास असल्याचा गौरवोद्गार तत्कालीन लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काढले होते. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजास भारताचा ‘जीडीपी’ संबोधले होते. अशा गौरवशाली समाजाच्या जन्माचा इतिहाससुध्दा तितकाच रोचक आहे. समाजाच्या उत्पत्तीविषयी विविध इतिहास संशोधकांच्या मते विभिन्न कथा प्रचलित आहेत. परंतु, सर्वच कथांचा आत्मा बहुतांशी सारखाच आहे. माहेश्वरी समाजाचे वंशज आदी क्षत्रिय होते व तद्नंतर ज्येष्ठ शु. नवमी अर्थात महेश नवमीच्या पावन पर्वावर भगवान महेशाच्या आशीर्वादाने लोहार्गल (राजस्थान) येथे वैश्य झालेत.

राजस्थानातील खंडेला राज्याचे महाप्रतापी राजा खडगलसेन यांना पुत्रेष्ठी यज्ञाद्वारे सुजानकुंवर नावाचा अत्यंत तेजस्वी, शूर-वीर पुत्ररत्न प्राप्त झाले. पुत्र जन्मानंतर, यज्ञात सहभागी ऋषींनी सुजानकुंवर यास उत्तर दिशेला धोका असण्यची भविष्यवाणी केली. सुजानकुंवर यांनी तारूण्यात पदार्पण करताच परंपरेनुसार राजा खडगलसेन यांनी पुत्राचा राज्याभिषेक करत उत्तरेकडे प्रवास न करण्यास बजावले आणि स्वत: वानप्रस्थाश्रम स्वीकारला.

असे म्हटले जाते की, त्या काळात काही अज्ञानी, स्वार्थी आणि वेदविरोधी शक्तींनी यज्ञकर्मात हिंसेचा समावेश करायला सुरुवात केली. त्यामुळे यज्ञकर्माला विरोध होऊ लागला व राजा सुजनकुंवरसुध्दा कट्टर यज्ञविरोधी बनले. दरम्यान, पित्याच्या सूचनेचे विस्मरण होत अनावधानाने राजा सुजानकुंवर आपल्या 72 सरदारांसह उत्तर दिशेला शिकारीसाठी गेले. तेथे काही ऋषींना यज्ञ करताना बघून, ते अत्याधिक क्रोधित झाले व त्यांनी आपल्या सरदारांकरवी यज्ञाचा विध्वंस केला. त्यामुळे संतप्त ऋषींनी राजासह सर्व सरदारांना पाषाण होण्याचा शाप दिला. हे वृत्त ऐकताच दु:खातिरेकाने राणी चंद्रावती वगळता इतर राण्यांसमवेत खडगलसेन यांनी प्राणत्याग केला. राणी चंद्रावती अत्यंत बुद्धिमान व चाणाक्ष विदूषी होत्या. त्या सर्व सरदारांच्या पत्नींसह ऋषींना शरण गेल्या आणि सार्‍यांना शापमुक्त करण्याची वारंवार विनवणी करू लागल्या.

ऋषींच्या सूचनेनुसार त्या सर्व स्त्रियांनी भगवान महेश व माता पार्वतीची उपासना व तपश्चर्या केली. त्यावर प्रसन्न भगवान महेशाने राजा सुजानकुंवर व सर्व 72 सरदारांना पुन:श्च जीवदान देत क्षत्रिय धर्माऐवजी वैश्यधर्म स्वीकारण्याचा आदेश दिला. भगवान महेशाच्या आदेशानुसार राजासह सर्व सरदारांनी यज्ञस्थळाच्या जवळच असलेल्या जलकुंडात स्नान केले असता त्यांचे लोखंडाचे शस्त्र गळून पडलेत (नष्ट झालीत) व ते वैश्य बनलेत; म्हणूनच या स्थानाचे नाव लोहार्गल पडले…

भगवान महेशाच्या आशीर्वादाने उत्पन्न या माहेश्वरी समाजातील बिर्ला, बांगड, सोमाणी, दमाणी (डी-मार्ट), बियाणी (बिग बाजार) राठी, सोनी इ. अनेक उद्योजक घराण्यांनी व इतर सर्वच समाजबांधवांनी भारताच्या विकासात आपापले योगदान दिले आहे. महेश नवमीच्या सगळ्यांना कोटी-कोटी शुभेच्छा!

                                                          प्रो.संजय दहाड
                                                        (9423772227)
                              लेखक महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेचे संघटनमंत्री आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या