जळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा
Featured

जळगाव : भाजपा महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेचा पाठिंबा

Balvant Gaikwad

राज्यात विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेनेची युती तुटल्यानंतर सेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसला सोबत घेवून महाविकास आघाडीच्या माध्यमातून वेगळी चूल मांडलेली असतांना जळगाव मनपात मात्र भाजपाच्या महापौर पदाच्या उमेदवाराला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.

त्यामुळे महापौर पदाची निवड बिनविरोध होणार आहे. जळगाव महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. ५७ सदस्य भाजपाचे निवडून आले आहेत. महापौर सीमा भोळे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदासाठी निवडणूक होत आहे. महापौर पदासाठी भाजपाच्या वतीने नगरसेविका भारती सोनवणे यांनी अर्ज दाखल केला.

त्यावेळी शिवसेनेचे गटनेते नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी उपस्थित राहून भारती सोनवणे यांना पाठिंबा दिला. एकीकडे राज्यात भाजपा-सेनेत मोठे तांडव सुरू असतांना जळगावात मात्र सेनेने भाजपा उमेदवारास पाठिंबा दिल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

दरमयान याबाबत शिवसेनेचे महानगरप्रमुख सुनील महाजन यांनी सांगितले शहराच्या विकासासाठी आम्ही महापौर पदाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तसेच प्रभाग क्र. १९ अ मधील रिक्त जागेवर भाजपाने देखील आमच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com