साडेचार लाखांचे अवैध मद्य पकडले

साडेचार लाखांचे अवैध मद्य पकडले

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; एलसीबीची कारवाई

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन, संचारबंदीच्या कालावधीत मद्य विक्रीस बंदी असताना देखील अवैधरित्या दारू विक्री करणार्‍यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली. यात चार लाख 60 हजार 54 रुपयांची अवैध विदेशी दारू पकडून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटेच्या सुमारास अजिंठा चौफुलीजवळील आर.के.वाईन शॉपजवळ झाली. कोरोनाच्या कालावधीतील जिल्ह्यामधील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बापू रोहोम व त्यांच्या सहकार्‍यांना गुप्त माहिती मिळाली होती की, आर.के.वाइन शॉप दुकानाच्या बाहेर एका पांढर्‍या रंगाच्या टाटा इंडिगो गाडीत आर.के.वाइन शॉपचे मालक दारू विक्री करीत आहे. त्यानुसार तेथे पोलिसांचे पथक पोहचले.

पोलिसांनी संबंधित गाडीजवळ धाड टाकली. गाडीजवळील तीन पैकी दोन जण सापडले. तर एक जण निघून गेला होता. या ठिकाणी नितीन शामराव महाजन (वय 29, अजिंठा हौसिंग सोसायटी समाजमंदिराजवळ) आणि नरेंद्र अशोक भावसार (वय 33, शांतीनिकेतन हौसिंग सोसायटी, अयोध्यानगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

पांढर्‍या रंगाच्या टाटा इंडिगो गाडी (क्र.एमएच 18 डब्ल्यू 9842) मध्ये दारुचे बॉक्स सापडले. ही दारू आर.के.वाइनचे मालक दिनेश राजकुमार नोतवाणी (आदर्शनगर) यांनी त्यांच्या दुकानातून काढून दिली. पोलिसांना बघून ते निघून गेल्याचे महाजन याने पोलिसांना सांगितले. परंतु, पोलिसांनी दिनेश नोतवाणी यास देखील हजर केले.

गाडीतून काढली दारू

या वेळी नोतवाणी याच्या तोंंडाला माक्स अथवा रुमाल नव्हता. त्याच्याकडे माक्स नसल्यामुळे त्यास पोलिसांनी माक्स दिले. पोलिसांनी लायसन्सबाबत नोतवाणी यास विचारले असता, दोन्ही लायसन्स त्याची पत्नी दिशान दिनेश नोतवाणी यांच्या नावावर आहे.

दुकानावर मॅनेजर गणेश कासार (शिवाजीनगर) आहे. ही दारू नोतवाणी व कासार याने संबंधितांना काढून दिल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी महाजन व भावसार यांच्याकडील गाडीमधील दारू ताब्यात घेतली.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अमोल ज्ञानेश्वर पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यावरुन नितीन महाजन, नरेंद्र भावसार, दिनेश नोतवाणी, मॅनेजर गणेश कासार, दिशान दिनेश नोतवाणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तर महाजन व भावसार आणि दिनेश नोतवाणी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com