भाजपात यादवी
Featured

भाजपात यादवी

Balvant Gaikwad

जळगाव  – 

भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदासाठी जळगाव येथील संत बाबा हरदासराम मंगल कार्यालयात निवड प्रक्रिया सुरु होती.

निवड प्रक्रियेचा कार्यक्रम सुरु असताना भुसावळचे काही भाजपा कार्यकर्ते जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांनी भाजपा कार्यकारिणीत डावलल्याचा आरोप करीत ना. दानवे यांना निवेदन देण्यासाठी पुढे सरसावले. त्यातच काही कार्यकर्ते अचानक व्यासपीठावर चढले आणि प्रा. सुनील नेवे यांच्या तोंडावर शाई फेकून त्यांना काही कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी दुपारी 2.10 वाजता घडली.

त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. ना. दानवे आणि आ. महाजन यांच्यासमोर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवडीला गालबोट लागल्याने या दांगडोमुळे ना. दानवे यांनी काढता पाय घेतला. भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रियेला दि. 10 रोजी सकाळी 11 वाजेपासून सुरुवात झाली.

भाजपा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. एक वाजेच्या सुमारास केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आ. गिरीश महाजन यांचे आगमन झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर नवनिर्वाचित जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्ष आणि जिल्ह्यातील भाजपा सभापतींचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरु झाली. तत्पूर्वी भुसावळच्या काही कार्यकर्त्यांनी जिल्हा सरचिटणीस प्रा. सुनील नेवे यांनी भुसावळ तालुका कार्यकारिणीत 11 नावांपैकी एकच नाव पाठविले. या कारणावरुन रोष व्यक्त करीत निवडणूक निर्णय अधिकारी तथा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना निवेदन देऊन प्रा. नेवे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी लावून धरली.

ना. रावसाहेब दानवे व आ. गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत असताना काही कार्यकर्ते अचानक मागील बाजूस प्रा. नेवे व्यासपीठावर असल्याने त्यांच्या अंगावर शाई फेकून त्यांचे तोंड काळे केले. काही कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

या दरम्यान, भाजपच्या दांगडोखोरांना आवरण्याच्या नादात आ. सुरेश भोळे, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, शहराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी यांच्यासह काही भाजपच्या पदाधिकार्‍यांच्या कपड्यांवर शाईचे डाग पडले होते. हा गोंधळ सुरु असताना ना. रावसाहेब दानवे यांनी काढता पाय घेतला.

त्यानंतर आ. गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांना शांत करीत पुन्हा भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया सुरु झाली. वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी अखेर माजी खा. हरिभाऊ जावळे यांची वर्णी लागली. निवडीनंतर भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Deshdoot
www.deshdoot.com