येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी कोल्हापूर येथील डॉ.मिनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांची बदली कुठे करण्यात आली याचा उल्लेख मात्र आदेशात करण्यात आलेला नाही.
कोरोनाच्या जीवघेण्या संकटात वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.भास्कर खैरे यांच्या हलगर्जीपणापायी जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढली असल्याचा आरोप सामाजिक संघटनांसह राजकीय पदाधिकार्यांनी केला होता.
मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ता योगेश देसले यांनी देखील जळगावातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यूदर वाढत असल्याबाबत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याकडे तक्रार केली होती.
दरम्यान, शुक्रवारी कोल्हापूर येथील डॉ.मिनाक्षी गजभिये यांची जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आल्याचे आदेश शासनातर्फे जारी करण्यात आले आहे.