देशदूत संवाद कट्टा : सुत्रसंचालनात भाषेचा वापर सुंदर हवा – सौ.मंगला खाडिलकर
Featured

देशदूत संवाद कट्टा : सुत्रसंचालनात भाषेचा वापर सुंदर हवा – सौ.मंगला खाडिलकर

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

‘देशदूत संवाद कट्टा’ मध्ये सुसंवादिनी मंगला खाडिलकर यांनी साधला संवाद

लाईव्ह बघण्यासाठी – https://www.deshdoot.com/video-deshdoot-sawmwad-katta/

जळगाव । प्रतिनिधी

सूत्रसंचालनात भाषेच्या वापरासोबतच शब्दफेक महत्त्वाची असते. आपल्या शब्दफेकीवर श्रोता मंत्रमुग्ध झाला पाहिजे. त्यासाठी सूत्रसंचालनात भाषेचा वापर सुंदर हवा. त्यात कोणतीही कृत्रिमता नको, अशी माहिती प्रसिद्ध सूत्रसंचालनकार  सुसंवादिनी मंगला खाडिलकर यांनी दिली.

बालगंधर्व संगीत महोत्सवानिमित्त त्या शुक्रवारी जळगावात आल्या होत्या. देशदूतच्या ‘संवाद कट्टा’मध्ये ‘निवेदन व सुसंवाद’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. या वेळी देशदूतचे महाव्यवस्थापक विलास जैन, संपादक अनिल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. संवाद साधताना त्या म्हणाल्या की, जीवनात प्रत्येक घडीला सुसंवाद महत्त्वाचा  असतो. तुमची भाषा, भाषेचा वापर व बोलतानाचा अभिनय यासोबतच तुम्ही बोलतात ते दुसर्‍यांनी ऐकावे यासाठी अर्थ, भाषा, वाक्याची योजना ही माफक असली पाहिजे. तसेच वक्त्याकडे नम्रपणा असला पाहिजे आणि हा नम्रपणा अभ्यासातून येतो. सूत्रसंचालन करताना मनात गोंधळ असता कामा नये. त्याचप्रमाणे निवेदनात हजरजबाबीपणा सर्वात महत्त्वाचा असतो. ऐकीव माहितीवर वेळ मारून नेता येत नसते. त्यासाठी बोलणे जितके आकर्षक तेवढेच अभ्यासपूर्ण असणे गरजेचे असते. सूत्रसंचालन करताना प्रेक्षकतुमचा चाहता होईल यादृष्टीने शब्दफेक करता आली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. हे सांगताना त्यांनी संत तुकारामांच्या अभंगांचे दाखलेही दिले.

अलीकडे सूत्रसंचालनात शेरोशायरी किंवा कवितांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. या विषयावर बोलताना त्या म्हणाल्या की, शेरोशायरी किंवा कवितांचा वापर केलाच पाहिजे. त्याशिवाय प्रेक्षक खिळून राहत नाहीत. मात्र, कविता किंवा शेर हे विषयाशी सुसंगत आहेत का, हे बघणेदेखील तेवढेच महत्त्वाचे ठरते. निवेदनात काय सांगायचे याची मांडणी सुसंगतपणे करावी लागते, असे सांगताना या वेळी त्यांनी पु.ल.देशपांडे, व.पु.काळे, शांताबाई शेळके, अमीन सयानी, तबस्सुम, अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाचेही दाखले दिले. दर्जा आपण निर्माण करत असतो. त्यामुळे आपला दर्जा आपल्याला निर्माण करता आला पाहिजे. बोलण्याच्या क्षेत्रात येणार्‍याकडे सर्व भाषांचा अभ्यास असणे महत्त्वाचे असते, असेही त्या म्हणाल्या.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com