जळगाव : कोरोनाच्या संशयावरुन ताब्यात  घेतलेल्या फ्रेंच पर्यटकाची सुटका
Featured

जळगाव : कोरोनाच्या संशयावरुन ताब्यात घेतलेल्या फ्रेंच पर्यटकाची सुटका

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

जळगाव | प्रतिनिधी

 कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जनता कर्फ्यू सुरू असताना फ्रान्सहून आलेल्या एका फ्रेंच पर्यटकास पोलिसांनी रविवारी सकाळी ताब्यात घेवून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आणले. परंतु, तो वैद्यकीय तपासणीच्या मार्गदर्शक सूचनांच्या निकषात बसत नसल्यामुळे त्याची रुग्णालयातून सुटका झाली आहे. जनता कर्फ्युमुळे रविवारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने तो पर्यटक शहरातील रस्त्यांवर फिरत होता. शहरात विदेशी पर्यटक फिरत असल्याचे कळताच पोलिसांची तारांबळ उडाली होती. पोलिसांनी त्याला  सुरक्षेच्या दृष्टीने ताब्यात घेवून रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले.
फ्रान्स देशातून लुनिया नामक  पर्यटक २१ डिसेंबरपासून भारतात आलेला आहे. तो  जगप्रसिद्ध  अजिंठा आणि वेरुळ लेणी पाहण्यासाठी रेल्वेने जळगावात आला. पण, जनता कर्फ्यूमुळे सर्वत्र बंद असल्याने त्याला थांबण्यासाठी स्टेशन परिसर व इतरत्र कुठेच हॉटेल मिळत नव्हते. तसेच कर्फ्यूमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील बंद असल्याने तो  रस्त्यांवर फिरत होता. हा प्रकार जळगाव पोलीस दलातील शीघ्र कृती दलाचे कर्मचारी कृष्णा पाटील यांच्या लक्षात आली. पोलिसांनी त्यास विचारपूस करुन त्याला कोर्ट चौकात थांबवले. यासंदर्भात कृष्णा पाटील यांनी पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षाला  कळवले. पोलिसांनी १०८ क्रमांकावरुन रुग्णवाहिका बोलावून घेत  पर्यटकाला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी हलवले. या प्रकारामुळे काहीवेळ  पर्यटक देखील गोंधळला होता.
त्रास, लक्षणे नाही
या पर्यटकास कोरोनासंदर्भात कोणताही त्रास, लक्षणे आढळले नाही. तसेच तो भारतात २१ डिसेंबरपासून आलेला आहे. त्यानंतर चीनमध्ये ३१ डिसेंबर रोजी जगातील पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला होता. कोरोनाचा त्रास सुरू होण्यापूर्वीच तो भारतात आहे. त्यामुळे विदेशातून कोरोना संशयित किंवा रुग्णाशी त्याचा संपर्कच झालेला नाही. कोरोनासंदर्भात तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या आहे. या सूचनाच्या निकषात तो पर्यटक बसत नाही. त्यामुळे त्याची आरोग्य तपासणी अथवा त्याच्या लाळीचे नमुने घेण्याची गरजच नाही. डॉक्टरांनी लाळीचे नमुने घेवून ते पुण्याला तपासणीसाठी पाठवले, तरी रुग्णाची ‘केस हिस्ट्री’ बघता ते अशा रुग्णाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत नाही. दरम्यान, या अगोदर जिल्हा रुग्णलयाने दोन जणांच्या घेतलेल्या नमुन्यांची तपासणी पुण्यातील प्रयोगशाळेने नाकारली आहे.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com