शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकपदी जि.प.चे सीईओ 
Featured

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासकपदी जि.प.चे सीईओ 

Balvant Gaikwad

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असून 14 कोविड संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याचे चित्र आहे. या रुग्णालयातील सुविधा आणखी प्रभावीपणे वापरणे तसेच सर्व संबंधित यंत्रणामध्ये योग्य समन्वय साधणे व प्रशासकीय बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात येऊन त्यांना प्रशासकीय अधिकार प्रदान करण्यात आल्याचे आदेश मंगळवार दि.2 जून रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी दिले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकार्‍यांनी रुग्णालयातील सुविधा आणखी प्रभावीपणे वापरणे तसेच सर्व संबंधित यंत्रणांमध्ये योग्य समन्वय साधणे व प्रशासकीय बाबींवर नियंत्रण ठेवावे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे त्यांचे नियमित रुग्ण सेवेचे व उपचाराचे कार्य उपलब्ध यंत्रणेमार्फत सुरु ठेवतील. तसेच संबंधित अधिष्ठाता यांना संपूर्ण वित्तीय अधिकार असतील, असेही आदेशात उल्लेखित केले आहे.

आरोग्य मंत्री टोपे यांच्या उपस्थितीत जळगावात आज आढावा बैठक

राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेंतर्गत 3 जून रोजी सकाळी 10 वाजता जळगावातील जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

तसेच राज्याचे पाणी पुरवठामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली 3 जून रोजी आयोजित दुपारी 4 वाजेची बैठक रद्द करण्यात आलेली आहे, असे जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com